‘Air India’ च्या इंजिनीअरचा गुजरातमध्ये खून, ‘या’ कारणावरून झाला पर्दाफाश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माहीम आणि कल्याण येथे सुटकेसमध्ये मृतदेह मिळाल्याच्या घटना ताज्या असतानाच मुंबईतील आणखी एका व्यक्तीचा अशाप्रकारे खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. एअर इंडियामध्ये इंजिनीअर असलेल्या दीपक पांचाळ (वय- 59) यांचे अपहरण करून गुजरातमध्ये त्यांचा खून करण्यात आला. दोन महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांनी पांचाळ यांचा मृतदेह गोणीत बांधून गुजरातच्या ब्राह्मणी धरणात टाकला होता.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना गोणीत सापडलेल्या मृतदेहाच्या शर्टच्या शिशात एअर इंडियाच्या फ्लाईटचे तिकीट सापडले. PNR नंबरवरून तपास केला असता हा मृतदेह दीपक पांचाळ यांचाच असल्याचे स्पष्ट झाले दीपक यांचे अपहरण करून गुजरातमध्ये त्यांचा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी ही माहिती दिली आहे. तिघांनी दीपक पांचाळ यांचा खून कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप समजू शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक पांचाळ हे एअर इंडियामध्ये इंजिनीअर होते. अंधेरी येथे ते वास्तव्यास होते. ते अविवाहित होते. 29 सप्टेंबरला ते बेपत्ता झाले होते. पांचाळ यांच्या भावाने त्याबाबत अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. बरेच दिवस शोध घेऊनही पोलिसांना पांचाळ यांचा थांगपत्ता लागला नव्हता. पांचाळ यांचे अपहरण झाल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरु केला. तपास सुरु असताना गुजरातच्या हलवद पोलिसांना धरणात मृतदेह असलेली गोणी सापडल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. हा मृतदेह पांचाळ यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/