पुणे विमानतळावर विमानाचा मोठा अपघात टळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात होता होता टळला. एअर इंडियाचे विमान उड्डाण घेत असताना अचानक धावपट्टीवर एक व्यक्ती जीपसह आली. विमानाच्या पायलटने वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने हा अपघात टळला.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाचे A-321 हे विमान श्रीनगरसाठी उड्डाण भरणार होते. मात्र, अचानक एक व्यक्ती जीप घेऊन धावपट्टीवर आल्याचे विमानाच्या पायलटला दिसले. तोपर्यंत विमान धावपट्टीवरून पुढे निघाले होते. धावपट्टीवर एक व्यक्ती आणि तोही जीपसह आढळून आल्याने पायलटने प्रसांगवधान दाखवत विमान जीपला धडकू नये यासाठी इर्मजन्सी टेक ऑफ केले. विमानाने वेळीच टेकऑफ केले मात्र विमानाचा मागील भाग जीपवर आदळला.

विमानाने यशस्वी टेकऑफ केले. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी धावपट्टीवर धाव घेत जीप चालकाला ताब्यात घेतले. घडलेल्या या प्रकारावर एअर इंडियाचे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, नेमका हा प्रकार कसा आणि का घडला या प्रकाराची चौकशी करण्यात येणार आहे. तसे आदेश देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.