जगातील सर्वाधिक प्रदूषित 30 शहरांपैकी 22 शहरे भारतात : अहवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी २२ शहरे भारतात आहेत. इतकेच नव्हे तर जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी असलेल्या शहरांमध्ये दिल्ली पहिल्या स्थानावर आहे. हे स्विस संगठन आईक्यू एअरद्वारे तयार केलेले आणि मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या वर्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२० मध्ये सांगण्यात आले आहे. २०१९ च्या तुलनेत दिल्लीची हवेची गुणवत्ता २०२० मध्ये सुधारली असल्याचे अहवालात नमूद केले आहे. परंतू या सुधारणेनंतरही जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचा दहावा क्रमांक लागतो. राजधानीच्या शहरानबद्धल बोलायचे झाल्यास दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे. अहवालात म्हंटले आहे की, जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये भारत प्रमुख आहे आणि जगातील सर्वाधिक प्रदूषित ३० शहरांपैकी २२ शहरे भारतातील आहेत.

दिल्लीशिवाय उत्तर प्रदेश, गाझियाबाद, बुलंदशहर, बिसरख जलालपूर, नोएडा, ग्रेटर नोएडा, कानपूर, लखनऊ, मेरठ, आग्रा, मुझफ्फरनगर, राजस्थानमधील भिवाडी, हरियाणामधील फरिदाबाद, जिंद, हिसार, फतेहाबाद, बांधवाडी, गुरुग्राम, यमुनानगर, रोहतक आणि धारुहेडा, बिहारमधील मुजफ्फरपूर. या अहवालानुसार जगातील चीनमधील सर्वाधिक प्रदूषित शहर झिनजियांग आहे. त्यानंतर पहिल्या १० शहरात ९ शहरे भारताची आहेत. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत गाझियाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्या पाठोपाठ बुलंदशहार, बीसरख, जलालपूर, नोएडा, ग्रेटर नोएडा, कानपुर, लखनऊ, भिवाडीचा क्रमांक लागतो.

या शहरांमधील प्रदूषणाची पातळी पीएम २.५ च्या आधारे मोजली गेली. कोविड १९ लॉकडाउनचे दुष्परिणाम आणि जगभरातील पीएम २.५ प्रदूषकांमधील बदलाचेही या अहवालात वर्णन केले आहे. भारतातील प्रदूषणाचे मुख्य घटक म्हणजे वाहतूक, स्वयंपाकाचे इंधन, वीज निर्मिती, उद्योग, उत्पादन कार्य, कचरा जाळणे. अहवालानुसार परिवहन क्षेत्र हे भारतातील शहरांमध्ये पीएम २.५ प्रदूषकांचे सर्वात मोठे स्रोत आहे.