Air Strike : मेहुण्यानंतर मसूद अझरच्या दोन भावांचाही खात्मा 

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – आज भारतीय वायुसनेनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला करून , जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बवर्षाव करून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे.  हवाई दलानं जैशच्या ज्या तळावर  कारावाई केली त्यात ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाले तसेच जैश-ए-मोहम्मद म्होरक्या मसूद अझरचा मेव्हणा मौलाना युसूफ अझर ठार झाला होता. आता मेहुण्यानंतर मसूद अझरच्या दोन भावांचाही खात्मा झाल्याची माहिती मिळाली आहे. इब्राहिम अझर मुफ्ती आणि अझर खान काश्मिरी अशी त्यांची नावे आहेत.

जैश- ए- मोहम्मदचे कंट्रोल रुम उद्ध्वस्त – आज मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान ‘मिराज २०००’ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई केली. ‘ या कारवाईत हवाई दलाने जैश- ए- मोहम्मदसह हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनांचेही तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटेचे कंट्रोल रुम अल्फा- ३ हे संपूर्णपणे उद्ध्वस्त  झाले. या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी मारले गेल्याची माहिती मिळाली आहे.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पुलवामा येथील हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.