‘एअर स्ट्राइकचा मुद्दा निवडणुकीशी जोडला जाऊ नये’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – पाकिस्तानविरोधात भारताने केलेल्या एअर स्ट्राइकचे श्रेय कोणी घेण्याची गरज नाही, दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकचा मुद्दा लोकसभा निवडणूकीशी जोडला जाऊ नये असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

नितीन गडकरी एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “पंतप्रधान पदासाठी मी दावेदार नाही तसेच मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पण नाही. नरेंद्र मोदी यांना मोठ्या प्रमाणात जनमत मिळत असून ते पुन्हा पंतप्रधान होतील. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोदी सरकारला प्रचंड जनाधार मिळेल” असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. याशिवाय, “पाकिस्तानच्या विरोधातील कारवाईला निवडणूकांशी जोडलं नाही पाहिजे किंवा प्रचारासाठी याचा मुद्दा म्हणून वापर करु नये. विरोधी पक्ष यावर शंका उपस्थित करत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण मी त्यांना आवाहन करेल की या मुद्द्यावर राजकारण करु नका.” असेही गडकरी म्हणाले.

त्यामुळे देशात ‘या’ मुद्द्यावर राजकारण होऊ नये’

या मुलाखती दरम्यान, सत्ताधारी पक्षाकडूनच प्रचारात ‘या’ मुद्द्याचा वापर केला जातोय, हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मात्र नितीन गडकरी म्हणाले की, “सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आाहे. या मुद्द्यावर कोणीही राजकारण करु नये, भारतात जर कोणालाही शहीद जवानांच्या कुर्बानीवर प्रश्नचिन्ह आहे, जर कोणी पाकिस्तानची भाषा बोलत असेल तर ते देशहिताच्या विरोधात आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. त्यामुळे देशात या मुद्द्यावर राजकारण होऊ नये असं मला वाटतं.” असं त्यांनी स्पष्ट केलं.

‘भाजपाला बहुमत आलं नाही तरी मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही’

यावेळी बोलताना गडकरींना विचारण्यात आलं की, निवडणूक निकालानंतर जर या सरकारला कोणत्या इतर राजकीय पक्षांची मदत घ्यावी लागली तर पंतप्रधान पदासाठी तुमचं नाव पुढे केलं जाऊ शकतं. यावरही नितीन गडकरी यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, “जरी भाजपाला बहुमत आलं नाही तरी मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही. पंतप्रधान बनण्याची माझी कोणतीही इच्छा नाही अथवा आरएसएसकडूनही अशी कोणती योजना नाही. माझ्या वक्तव्याची मोडतोड करून मिडीयामध्ये दाखवलं जातं. मी कधीच पंतप्रधान पदाचा दावेदार आहे किंवा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहे असं कुठेही म्हटलं नाही.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like