‘कोरोना’ पसरण्याच्या शक्यतेने विमानांची उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील दहा दिवसात कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढण्याच्या शक्यतेने अनेक विमान कंपन्यांनी चीनमधील उड्डाणे रद्द केली आहेत. त्यात एअर इंडियासह ब्रिटीश एअरवेज, लुफ्तान्सा, लॉयन एअर, इंडिगो एअरलाईन्स यांचा समावेश आहे. एअर इंडियाने १४ दिवसांसाठी उड्डाणे रद्द केली आहेत. यापैकी काही कंपन्यांनी २, ३ दिवसांसाठी उड्डाणे थांबवली आहेत.

दरम्यान, चीनमध्ये कोरोनाचे थैमान चालूच आहे. आता मृतांची संख्या १७० वर जाऊन पोहोचली आहे आणि १७०० नवे रुग्ण दाखल झाले आहेत. १३७० रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. या संसर्गाचे वर्णन चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी राक्षसी असे केले आहे. चीन सरकार माहिती देण्याबाबत पारदर्शी राहील, असे सरकारी प्रवक्त्याने म्हटले आहे. कोरोनाची बाधा झालेला पाचवा रुग्ण आज फ्रान्समध्ये आढळला. चिनी पर्यटकाच्या मुलीला कोरोना झाल्याचा संशय आहे. चीनमधील १६० कॅनेडियन नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी कॅनडा सरकारने विमानाची व्यवस्था केली आहे. चीनमधील वुहान प्रांताजवळ विमान उतरविण्यासाठी कॅनडाने परवानगी मागितली आहे.

फेसबुक पेज लाईक करा