विमान कंपन्यांची चलाखी, प्रवाशांना तब्बल 3 हजार कोटींचा चुना लागणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशातील विमान सेवा बंद करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये सरकारच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत आगाऊ तिकीट बुकिंग करणाऱ्या विमान कंपन्यांनी तिकीटाचे पैसे परत देण्यास टाळाटाळ सुरु केली आहे. यामुळे प्रवाशांना किमान तीन हजार कोटींचा चुना लागण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनपूर्वी कंपन्यांनी आगाऊ तिकीट विक्री केली होती.

सरकारने विमान सेवा बंद केल्यानंतर प्रवाशांची गैरसोय झाली. प्रवाशांना पैसे परत करण्याइतपत निधी कंपन्यांकडे नसल्याने काही कंपन्यांनी तिकिटाच्या रकमेइतके क्रेडीट पॉईंट दिले आहेत. मात्र ते वसूल करण्यासाठी प्रवाशांना आणखी काही काळ वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.

कंपन्यांनी प्रवाशांना रिफंडच्या बदल्यात 3 हजार कोटींचे क्रेडीट पॉईंट दिले आहेत. भविष्यात विमान प्रवासासाठी हे पॉइंट प्रवाशांना वापरता येणार आहे. काही प्रवाशांना 1500 कोटीं रुपये रिफंड करण्यात आले आहे. दरम्यान तिकिटांच्यापरताव्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. यात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने केंद्र सरकारने या प्रकरणी लक्ष घालावे आणि तोडगा काढावा असे आदेश दिले होते.

कंपन्यांची आर्थिक कोंडी
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे विमान कंपन्यांची पुरती आर्थिक कोंडी झाली आहे. कंपन्यांची आर्थिक बाजू डबघाईला आल्याने प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत करणे कंपन्यांसाठी अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत त्यांना रिफंडसाठी जबरदस्ती करणे अयोग्य आहे, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. अशा परिस्थितीत प्रवासी आणि विमान कंपनी या दोघांचे हित जपणारा तोडगा निघणे आवश्यक आहे, असे मत वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.

कंपन्यांनी केली नोकर कपात
कंपन्यांनी अनलॉकमध्ये काही निवडक मार्गावर विमान सेवा सुरु केली आहे. मात्र, यामध्ये मर्यादित आसन क्षमता आहे. मागील तीन महिन्यात लॉकडाऊनमध्ये झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्यांनी नोकर कपात, वेतन कपात करण्याचा पर्याय अवलंबला आहे.

तुर्त प्रवाशांना क्रेडीट पॉईंटवरच समाधान मानावे लागेल
नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने रिफंडबाबत घालून दिलेल्या नियमावलीच्या पूर्ततेचे प्रयत्न केले जात आहेत, असे स्पाइसजेट आणि इंडिगो या कंपन्यांनी म्हटले आहे. त्याशिवाय सध्या तिकिटांच्या बदली दिलेल्या क्रेडीट पॉईंटसाठी प्रवाशांची मुदत असली तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा कालावधी आणखी वाढवावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी तुर्त तिकिटाचे पैसे न मिळता क्रेडीट पॉईंटवरच समाधान मानावे लागणार आहे.