ऐश्वर्याने कॅन्सरग्रस्त मुलांसोबत केले ख्रिसमस सेलिब्रेशन !

मुंबई : वृत्तसंस्था – ऐश्वर्या रायने यंदाचा ख्रिसमस कॅन्सरग्रस्त मुलांसोबत साजरा केला आहे. टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयातील साधारणपणे २०० मुलांसोबत तिने हा खास दिवस साजरा केला. यावेळी  ऐश्वर्याने स्वत:ही कजरारे..कजरारे या गाण्यावर डान्स केला. त्यावेळी या कॅन्सरग्रस्त मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन ही तिच्या उत्तम अभिनयासाठी प्रसिद्ध आहेच. पण तिचे हे सामाजिक भानही अनेकदा दिसून येते. नुकतीच याची प्रचिती मिळाली. ऐश्वर्याचा हा मुलांसोबतचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गुलाबी रंगाच्या घेरदार ड्रेसमध्ये ऐश्वर्या खूप सुंदर दिसत आहे.
डान्स नंतर ऐश्वर्याने या मुलांना प्रेमाने जवळ घेतले आणि त्यांच्यासोबत भरपूर फोटोही काढले. यावेळी रुग्णालयातील चिमुकल्यांनी तिला ग्रिटींग कार्ड आणि गुलाब देऊन तिचे स्वागत केले. तर ऐश्वर्यासोबत त्यांनी केकही कापला, मुलांनीही यावेळी सांताक्लॉजच्या टोप्या घातल्या होत्या. लवकरच ऐश्वर्याचा गुलाब जामुन हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ऐश्वर्यासोबत तिचा नवरा अभिषेक बच्चन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.