‘क्वारंटाइन’ सेंटरबाबत ‘वादग्रस्त’ प्रतिक्रिया, थेट आमदाराला अटक

आसाम : वृत्तसंस्था – कोविड -१९ च्या रूग्णांवर उपचार करणार्‍या क्वारंटाइन सेंटर आणि रुग्णालयांच्या स्थितीबाबत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधान केल्याने आसाम पोलिसांनी मंगळवारी सकाळी राज्यातील विरोधी पक्षाचे आमदार अमीनुल इस्लाम (AIUDF MLA Aminul Islam) यांना अटक केली. अमीनुल यांनी क्वारंटाइन सुविधा व रुग्णालयांच्या स्थितीला डिटेन्शन सेंटर पेक्षा खराब असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत म्हटले होते की, निजामुद्दीन मरकज प्रकरणात तबलिगी जमातविरोधात प्रचार होत आहे. आसाममधील नगाव जिल्ह्यातील ढिंग येथील आमदार अमीनुल यांना सोमवारी रात्री आसाम पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि आज सकाळी त्यांना अधिकृतपणे अटक करण्यात आली.

महत्त्वाचे म्हणजे अमीनुल इस्लाम आपल्या वादग्रस्त आणि जातीयवादी विधानांमुळे यापूर्वीही चर्चेत आले होते. ते मौलाना बदरुद्दीन अजमल यांच्या पक्षाचे एआययूडीएफचे आमदार आहेत. यापूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाला होता ज्यामध्ये अमीनुल इस्लाम यांना असे म्हणताना ऐकले की, कोरोना व्हायरस क्वारंटाईन सेंटरची स्थिती डिटेन्शन सेंटरपेक्षा अधिक वाईट आणि धोकादायक आहे. आसाम सरकारने मुस्लिमांविरूद्ध कट रचल्याचा आरोपही त्यांनी केला. दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज यांच्या कार्यक्रमातून परत आलेल्यांना क्वारंटाइन सेंटरचे वैद्यकीय कर्मचारी त्रास देत असल्याचे अमीनुल इस्लाम यांनी म्हटले होते. हा मेडिकल स्टाफ निरोगी लोकांनाही आजारी आणि कोरोना व्हायरस असल्याचे मानत इंजेक्शन देत आहे.

भारतात आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४४२१ झाली आहे, तर ११४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३२६ लोकांचे उपचार झाले आहेत. मागच्या २४ तासात पाच मृत्यू आणि ३५४ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. आसाममध्ये या व्हायरसची २६ प्रकरणे समोर आली आहेत.