पुण्यातील बिल्डरनं दिली छोटा राजनला शिवसेनेच्या तत्कालिन नगरसेवकाची ‘सुपारी’, CBI तपासात झाले ‘निष्पन्न’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – २००९ सालच्या निवडणुक प्रचारादरम्यान शिवसेनेचे तत्कालिन नगरसेवक अजय भोसले यांच्यावर गोळीबार करुन त्यांना संपविण्याची सुपारी त्यांच्याच जवळ असणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाने दिल्याचे सीबीआयने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. बांधकाम व्यावसायिक सुरेंद्रकुमार अगरवाल यांनी शिवाजीनगर येथील सीबीआय न्यायालयात केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना सीबीआयने ही बाब समोर आणली आहे. याबाबतची माहिती अशी, शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक अजय भोसले हे ११ नोव्हेंबर २००९ रोजी सकाळी साडेदहा वाजता आपल्या मोटारीतून निवडणुक प्रचारासाठी जात असताना कोरेगाव पार्क येथे त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला होता. त्यात त्यांचा चालक शकील सय्यद जखमी झाला होता.

या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांना लावता न आल्याने हा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला होता. सीआयडीने गोळीबार करणारे दोघे जण निष्पन्न केले. मात्र, त्यांना हल्ला करण्यासाठी कोणी सुपारी दिली याचा तपास न झाल्याने अजय भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन गोळीबार करणाऱ्यांना कोणी सुपारी दिली, याचा शोध घेण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपविला होता. मात्र, बराच काळ सीबीआयला या प्रकरणात धागेदोरे मिळू शकले नव्हते. छोटा राजन याला भारतात आणल्यानंतर सीबीआयने त्याच्याकडे चौकशी केली. त्यात एस. के. अगरवाल यांनीच अजय भोसले यांची छोटा राजन याला सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले होते.

अगरवाल कुटुंबामध्ये कौटुंबिक मालमत्तेवरुन वाद होता. बांधकाम व्यावसायिक रामकुमार अगरवाल हे अजय भोसले यांचे मित्र आहेत. त्यांचा भाऊ सुरेंद्रकुमार अगरवाल याच्याबरोबर त्यांचा वाद होता. अजय भोसले यांनी त्यांच्यामध्ये मध्यस्थी करावी, असे छोटा राजन याने अजय भोसले यांना सांगितले होते. मात्र, त्यांचा तो कौटुंबिक वाद असल्याने त्यात मध्ये पडण्यास भोसले यांनी नकार दिला होता. त्यामुळे आपल्या भावाचा मित्र त्याला भडकावित असल्याचा समज सुरेंद्रकुमार याचा झाला. त्यातून त्याने छोटा राजन याला सुपारी दिल्याचे सीबीआय तपासात पुढे आले आहे. सुरेंद्रकुमार यांनी अटकपूर्व जामीनासाठी सीबीआय न्यायालयात अर्ज केला आहे. त्याला विरोध करताना सीबीआयने सुरेंद्रकुमार अगरवाल यांनीच सुपारी दिली असल्याचे म्हणणे मांडले आहे. अटकपूर्व जामीनावर न्यायालय शुक्रवारी निर्णय देणार आहे.