शेतकरी समर्थकानं आडवली अजय देवगणची कार; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई उपनगरातील गोरेगाव या ठिकाणी बॉलीवूड अभिनेता अजय देवगण याची कार एका पंजाबी व्यक्तीकडून अडवण्यात आली. त्या व्यक्तीने १५ मिनिटे ती कार रोखून धरली आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा का देत नाही असा प्रश्न विचारला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या तरूणाला अटक केली आहे.

राजदीप सिंह असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अजय देवगण शूटिंगसाठी फिल्मसिटीला जात असताना राजदीप सिंह या व्यक्तीने त्याची कार थांबविली आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा का देत नाही असे प्रश्न विचारू लागला. ही घटना मंगळवारी सकाळी गोरेगावमधील दिंडोशी परिसरात घडली.

अजय देवगण हा आपल्या कारच्या आत बसलेला होता. तेव्हा आरोपी राजदीप सिंह अजय देवगणला पंजाबचा शत्रू म्हणून बोलतो. आणि दिल्ली येथे चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलना समर्थनार्थ ट्विट का करत नाही असा जाबसुद्धा विचारत आहे. फिल्मसिटी जवळच १५ ते २० मिनिटे हा गोंधळ सुरु होता. त्यानंतर पोलिसांनी राजदीप याला अटक केली.