… म्हणून अजय देवगणकडून पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचे कौतुक !

पोलिसनामा ऑनलाईन – नक्षली भागात तळागाळापर्यंत त्यांनी काम केलं. त्यांनी बंदूक उचलणाऱ्या आदिवासींना शिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. नक्षलग्रस्त भागातील आदिवासींशी संपर्क साधण्याची मोठी मोहीम उघडली. त्यांच्या दारापर्यंत जाऊन त्यांचे घरांचे, जमिनीचे, आरोग्य, शिक्षण व बेकारीचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले. वास्तवात असणाऱ्या या सिंघम अधिकाऱ्यांचे नाव आहे अंकुश शिंदे. खुद्द सिंघम (अजय देवगण) यांनीही या सिंघम अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे गडचिरोली येथे असताना त्यांनी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. त्यांच्या या कामाची माहिती देणारा व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल झाला आहे.

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात तरुणांचे ब्रेनवॉश केलं जातं. त्यांना सशस्त्र चळवळीत ओढण्याचे काम सातत्याने करण्यात येते. सामान्य आदिवासीच्या मनात शासन, प्रशासनाविरुद्ध असंतोष निर्माण करण्यात येतो. त्यांना न जुमानणाऱ्यांना ठार करून दहशत निर्माण करण्यात येते. १९८४ पासून जवळपास ७०० आदिवासींना ठार करण्यात आले किंवा गंभीर जखमी केले. नक्षली भागात २२७ पोलिसांना हौतात्म्य आले. यामुळे नक्षलवाद्यांची त्या परिसरात दहशत होती. याला शह देण्यासाठी जून २०१७ मध्ये गडचिरोली परिक्षेत्राचा पदभार घेतल्यानंतर अंकुश शिंदे यांनी नक्षलग्रस्त भागातील आदिवासींशी संपर्क साधण्याची मोठी मोहीम उघडली होती. सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ५ लक्ष लोकांपर्यंत पोहोचून काम केल्याने आदिवासींचा विश्वास संपादन झाला. आदिवासी माहितीही देऊ लागले व नक्षलवाद्यांना विरोध करू लागले. त्यांच्या माध्यमातून ५१ पोलिसांचा बळी घेणारा मंगरू बोगामी याच्यासह ४० लोकांनी आत्मसमर्पण केले, तर ४ पोलीस व १९ आदिवासींना मारणारा डोळेश आत्रामसह ७२ (एकाच दिवशी ४०) एन्काउंटर झाले. दरम्यान येथील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित केल्या. यात ८८ हजार ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामार्फत १२५३ जणांना पदवी, पदविका शिक्षण दिले. आरोग्य तपासणी, बेरोजगारांचे मेळावे याचा हजारोंना लाभ झाला. पोलिसांनी आयोजित केलेल्या आदिवासी नृत्य स्पर्धांमध्ये २ लक्ष ७४ हजार जणांनी भाग घेतला. आता गडचिरोलीचे लोक मुंबई मॅरेथॉन, पुणे-फलटण या स्पर्धेतही सहभागी होत आहेत