सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करणारे अजय जाजू

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन

आदिवासी व ग्रामीण अकोले तालुक्यातील पत्रकार अजय जाजू यांना राज्यातील माहेश्वरी समाजात कोणी ओळखत नसेल असे होणे शक्य नाही, इतके त्यांचे काम राज्यासह देशभरात मोठे आहे. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर हीच त्यांची विशेष ओळख. मोठी स्वप्ने बघणे व ती पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणे हेच त्यांचे ध्येय. आणि सोशल मीडियाचा सकारात्मक कार्यासाठी वापर यामुळे त्यांचे नाव देशभरातील माहेश्वरी समाजात झाले आहे.

सन 2012 पासून देश विदेशातील जाजू परिवारातील लोकांना एकत्र करून त्यांचे संमेलन आयोजित करण्याचे एक मोठे पण अवघड स्वप्न बघितले. सोशल मीडियाचा लीलया वापर करणारे अजय जाजू यांनी पूर्ण आराखडा बनवून त्याचा पाठपुरावा सुरु केला. चिकाटीने प्रयत्न केले तर दैवही साथ देते, याचा त्यांना प्रत्यय आला.

सोशल मीडियाचा उपयोग करून देश विदेशातील तब्बल ८५० जाजू परिवार यांना एकत्र करून त्यांचे संमेलन भाजपा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष शामजी आणि प्रतिभा जाजू यांच्या उपस्थितीत सन 2016 व 2017 मध्ये दोन आंतरराष्ट्रीय जाजू संमेलन कुलदैवत फलौदी माता दरबार, मेडता रोड (राजस्थान) येथे भरवले. तर आता तिसऱ्या संमेलनाची तयारी त्यांनी सुरू केली आहे. हे त्यांच्या प्रयत्नांचे यशच म्हणावे लागेल. याकामी राकेश जाजू (इंदोर) यांचे विशेष सहकार्य लाभले.

अजय जाजू आपल्या व्यवसायासह गत तीस वर्षा पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून, सध्या मुक्त पत्रकार म्हणून काम पहात आहेत. अकोल्यातील विविध सामाजिक संस्थासह माहेश्वरी समाजाच्या तालुका, जिल्हा व राज्य संघटनेत पदाधिकारी म्हणून देखील कार्यरत आहेत. ते माहेश्वरी समाजासाठी ‘साप्ताहिक महेश वार्ता’ हे पत्रक चालवतात. या ‘महेश वार्ता’ मुळे राज्यातील माहेश्वरी समाजातील वेगवेगळ्या घडामोडींची माहिती मिळण्यासाठी व विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी माहेश्वरी समाजास एक चांगले हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेचे विद्यमान मानद मंत्री म्हणून काम पहाणारे अजय जाजू यांनी जिल्ह्यातील माहेश्वरी समाजासाठी देखील पत्रकारितेचा माध्यमातून न्याय दिला. तसेच जिल्हाध्यक्ष आर. डी. मंत्री व विठ्ठलदास आसावा यांच्यासोबत ग्रामीण भागातील प्रत्येक माहेश्वरी समाजापर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या सामाजिक कामांची व वेगवेगळ्या संस्थेत भूषवलेल्या पदांची तसेच मिळाविलेल्या पुरस्कार/सन्मानाची यादी इतकी मोठी आहे की ती येथे देणे शक्य नाही. संगमनेर माहेश्वरी समाजासाठी केलेले बाई-बेटी संमेलन, स्त्री भृण हत्या विरोधी जनजागृती करण्यासाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन ही कामे विशेष उल्लेखनीय आहेत.

पत्रकारिता, सामाजिक कार्यासह व्यवसायात नावलौकिक मिळविणाऱ्या अजय जाजू यांचेकडून समाज व देशाची अशीच सेवा घडत राहील हीच अपेक्षा.