‘लॉकडाऊन’वरून अभिनेत्याची पंतप्रधानांवर टीका, म्हणाला -“‘मोदी म्हणजे ‘बिग बॉस’ आठवडयातून एकदा देतात टास्क”

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असून केंद्र आणि राज्य सरकार खबरदारी घेत आहेत. अशातच अभिनेता एजाज खान सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. गेल्या काही काळात तो अभिनयापेक्षा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच जास्त चर्चेत राहू लागला आहे. अलिकडेच त्याने कोरोना विषाणूवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोमणा मारला होता. आता पुन्हा एकदा त्याने मोदींवर निशाणा साधला आहे. मात्र यावेळी 21 दिवसांच्या लॉकडाउनवरुन त्याने कॉमेंट केली आहे.

मोदीजी आपल्याला बिग बॉस खेळवत आहेत. आठवड्यातून एकदा येतात आणि नवा टास्क देऊन जातात. अशा आशयाचे ट्विट एजाजने केले आहे. एजाज खान एक टीव्ही अभिनेता आहे. त्याने या पूर्वी ‘अदालत’, ‘भाभी’, ‘केसर’, ‘कुसुम’, ‘क्या होगा निम्मो का?’ यांसारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये लहानमोठ्या भूमिका साकारल्या आहेत.

‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. मात्र गेल्या काही काळात तो आपल्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळे जास्त चर्चेत राहू लागला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एजाजने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय द्वंद सुरु होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.