..म्हणून अजिंक्य राहणेची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली

जयपूर : पोलीसनामा ऑनलाईन – देशाच्या निवडणुकांना जसा रंग चढत आहे तसा आयपीएलचा खेळ रोचक होत आहे. आयपीएलमध्ये कोणाची चांगली कामगिरी होत आहे, तर कोणाची खराब होते. त्याचा परिणामालाही त्यांना सामोरे जावे लागते. असंच यंदा आयपीएलमध्ये राजस्थानाचा कर्णधार अजिंक्य राहणेला चांगली कामगीरी करता आली नाही. त्याचा फटका रहाणेला बसला आहे.

अजिंक्य रहाणेला मुंबईविरुद्धच्या सामन्यात कर्णधारपदावरून हटवण्यात आलं आहे. पुढच्या सामन्यांमध्ये स्टीव्हन स्मिथ संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. यंदाच्या हंगामात रहाणेच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने एकूण ८ सामने खेळले आहेत त्यातील फक्त २ सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले आहे. संघाच्या एकूण कामगिरीमुळे गुणतक्त्यावर राजस्थान ७व्या स्थानावर पोहोचला आहे.

संघाच्या खराब कामगिरीमुळे राजस्थानचे प्रशिक्षक पॅडी कॅप्टन यांनी मुंबईविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर कर्णधारपदाबाबत विचार करत असल्याचे सांगितले होते. तसंच एक संघ म्हणून चांगली कामगिरी करण्यात राजस्थान अपयशी ठरत असल्याचेही त्यांनी सांगितलं होते.

दरम्यान, यंदाच्या हंगामात अजिंक्य आपल्या फलंदाजीची जादूही चालवू शकला नाही. तसंच मागील काही सामन्यांमध्ये त्याचा रनरेटही कमीच झाला होता. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून काढले आहे. मात्र यापूढेही रहाणेला चांगली कामगिरी करता आली नाही तर त्याला संघाबाहेर बसावे लागू शकते.