बाबांनी नेहमी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं, अजिंक्यनं शेअर केला लहानपणीचा फोटो

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जगभरात आज फादर्स डे साजरा केला जात असून प्रत्येक घरात वडिलांचे स्थान महत्वाचे मानले जाते. आई आपल्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचे काम करत असते, तर बाबा आपल्या परिवारातील सदस्यांना कोणताही त्रास होणार नाहीयाची काळजी घेत असतात. प्रसंगी कठोर भूमिका घेत आपल्या मुलांना योग्य वळणावर आणण्यासाठी कडक भूमिका घेणारे बाबा प्रत्येकासाठी हिरो असतात. भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार आणि मुंबईकर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनेही आजच्या दिवशी आपल्या बाबांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आई आणि बाबांसोबतचा आपला लहानपणीचा फोटो शेअर करत अजिंक्यने, बाबांनी नेहमी आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले आहे, असे राहणेने म्हटले आहे. क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहन देण्यामागे वडिलांचा मोठा हात असल्याचे अजिंक्यने याआधी अनेक मुलाखतींमधून सांगितले आहे. लहानपणी डोंबिवली ते मुंबई क्रिकेटसाठी सरावाला जात असताना बाबा फक्त पहिला दिवस आपल्यासोबत आले होते. यानंतर मला ट्रेनमध्ये एका डब्यात बसवून मी योग्य रितीने जातोय की नाही हे पाहण्यासाठी ते माझ्या पाठीमागून यायचे असे अजिंक्य म्हणाला होता.