‘सर्जिकल-एअर’ स्ट्राईक च्यावेळी मोदी सरकारला ‘गाइड’ करणार्‍या राष्ट्रीय सुरक्षा सल्‍लागार अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि मुत्सद्दी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित डोवाल यांना भारत सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. तसेच पुढील पाच वर्षांसाठी डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर कायम राहणार आहेत.

सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक या महत्वाच्या घडामोडी करण्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच त्यांनी चीन सोबतचा डोकलाम वाद, पाकिस्तानसोबतचा वाद आणि युद्धजन्य स्थितीमध्ये भारताची बाजू भक्कम केली होती. यामुळे त्यांनी देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये बहुमुल्य योगदान दिल्याने सरकारने डोवाल यांना पाच वर्षांसाठी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे.

अजित डोवाल यांनी बहुचर्चित राफेल विमानांच्या खरेदी आणि निवडीमध्येही महत्वाची भुमिका मांडली होती. तसेच त्यांनी भारताला पुढील १० वर्षे स्थिर सरकारची आवश्यकता असल्याचेही म्हटले होते. जगात, भारताची राजकीय आणि आर्थिक रणनिती आखण्यासाठी हे गरजेचं असल्याचेही डोवाल यांनी स्पष्ट केले होते. सन २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरेल. मात्र, त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. जे निर्णय लोकप्रिय नसतील, पण लोकांच्या हिताचे असतील, असे ते म्हणाले होते.

कोण आहेत अजित डोवाल ?

१९६८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी डोवाल यांनी ‘आयबी’मध्ये अनेक वर्षे सेवा केली आहे. ‘आयबी’चे प्रमुखपदही त्यांनी सांभाळले आहे. त्यांनी पाकिस्तानमध्ये तब्बल सहा वर्षे वास्तव्य केलं आहे. १९८८ मध्ये त्यांना ‘किर्ती चक्र’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले पोलीस अधिकारी आहेत.