पोलिसांच्या कार्यक्रमात NSA अजित डोवालांनी सांगितली छत्रपती शिवाजी महाराज आणि जीवा महालाची गोष्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, त्यांचा गनिमीकावा, रणनीती, नियोजन सर्वश्रुत आहे. पण गुरुग्राम येथे आयोजित पोलिसांच्या कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गुरुवारी छत्रपती शिवजी महाराजांच्या कार्याबद्दल त्यांच्यातील गुणांबद्दलची माहिती देत महाराजांनी जसा जीवा महाल घडवला तसे तरबेज व्हा असा संदेश पोलिसांना दिला.

अजित डोवाल म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल नेतृत्त्वाचे उत्तम उदाहरण आहे. एकदा घोड्यावरुन जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी एका व्यक्तीला दांडपट्टा फिरवून उडते पक्षी मारताना पाहिले. त्याला आपल्या सैन्यात सहभागी करून घेतले. प्रशिक्षण दिले. त्याच्या कौशल्यास पैलू पाडले. त्याचे नाव होते जीवा महाल.”

ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा प्रतापगडावर अफझल खानाला भेटले तेव्हा त्यांच्या सोबत जीवा महाला होता आणि अफझल खानासोबत होता सय्यद बंडा. भेटीदरम्यान अफझल खानाने दगा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर वार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी चिलखत घातले होते. त्यामुळे अफझल खानाचा वार फुकट गेला. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करण्यासाठी सय्यद बंडा धावून आला. त्याच्या हातात तलवार होती, ती तो महाराजांवर चालवणार इतक्यात अत्यंत चपळाईने जीवा महालाने बंडावर तलवार चालवली; सय्यद बंडाचा हात खांद्यापासून तुटला. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व कौशल्य याठिकाणी दिसून येते, असे अजित डोवाल यांनी सांगितले.

असे प्रशिक्षण घ्या की पोलीस जीवा महाल झाला पाहिजे
याशिवाय, जीवा महाला काय करू शकतो याची पूर्ण कल्पना छत्रपती शिवाजी महाराजांना होती. आपल्या माणसाचे कौशल्य अशा प्रकारे विकसित करायला हवे की प्रत्येक पोलीस जीवा महाल झाला पाहिजे, असे अजित डोवाल म्हणाले. याचबरोबर, यावेळी कायदा व सुव्यवस्था राखणे हे लोकशाहीचे सर्वात पवित्र कार्य आहे. आपण (पोलीस) हे लागू करणार आहात. जर आपण हे करू शकत नाही, तर लोकशाही अपयशी ठरेल. लोकशाहीमध्ये तुम्ही कायद्याबद्दल पूर्णपणे समर्पित राहणे फार महत्वाचे आहे. आपण आपले कार्य योग्यरित्या केले पाहिजे, असेही अजित डोवाल यांनी सांगितले.