अजित पवार नाराज, महाविकास सरकार लवकरच कोसळणार, ‘या’ केंद्रीय मंत्र्याचा दावा

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन –   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार नाराज आहेत. त्यामुळे आगामी दिवसात महाविकास आघाडीचे सरकार लवकरच कोसळणार आहे, असा दावा एका केंद्रीय मंत्र्याने नुकताच केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांच्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार नाराज होतील. तिन्ही पक्षाच्या अंतर्गत वाद आणि बंडाळी यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याचे काही खरं नाही. गणेश विसर्जनानंतर महाविकास आघाडी सरकारचे देखील लवकरच विसर्जन होईल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

आज बांद्रा इथल्या त्यांच्या संविधान निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले यांनी अभिनेता सुशांत सिंह रजपूत प्रकरण आणि पार्थ पवार यांच्याविषयी भाष्य केले.

बॉलिवूडमधील निर्माते दिग्दर्शक कलाकार चांगले असले तरी काही प्रमाणात कलाकारांवर अन्याय होत आहे. अभिनेता अमिताभ बच्चन सारख्या कलाकाराला ही सुरुवातीला संघर्ष करावा लागला. त्यानंतर ते मोठे कलाकार झाले. त्यामुळे अभिनेता सुशांत सिंह रजपूत या कलाकारावर अन्याय झाला आहे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयद्वारे झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय.

मुंबई पोलिसांचा जगात नावलौकिक आहे. त्यातुलनेत अभिनेता सुशांत सिंह रजपूतच्या आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास मंदावला. त्यामुळे पार्थ पवार यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. हि मागणी रास्त आहे. याअगोदही अनेक प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्याचा अर्थ आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही, असा होत नाही. मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे. पण, एखादे प्रकरण सीबीआय चौकशीसाठी द्यावे, ही मागणी करणे म्हणजे मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविणे असा देखील होत नाही. त्यामुळे अभिनेता सुशांत सिंह रजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, ही आमची देखील मागणी आहे, असेही रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

तसेच राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षात अंतर्गत वाद आहेत. पार्थ पवारबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार ही नाराज झालेत. तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकारचे लवकरच विसर्जन होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या कंपूत भीती असल्यामुळे संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्याआधी केंद्र सरकार पडेल, असे म्हंटले आहे.

दैनिक ‘सामना’ चालविणे सोपे आहे मात्र, नरेंद्र मोदी यांच्याशी ‘सामना’ करणे त्यांना जमणार नाही, असा टोला रामदास आठवले यांनी शिवसेनेला हाणला आहे. केंद्रातील मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार मजबूत आहे. या सरकारला 2024 पर्यंत धोका नाही. तसेच 2024 च्या ही निवडणुका मोदी सरकार जिंकेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like