Pune News : शिवजयंती कशी साजरी करायची ? अजित पवार यांनी केले ‘हे’ आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या संकटामुळे आपल्या सर्वांना सर्वच सण-उत्सव अगदी साधेपणाने व कोरोना बाबतच्या नियमांचे पालन करुन साजरे करावे लागले. तसेच अद्यापही कोरोनाचे संकट पूर्णपणे दूर झालेलं नाही. त्यामुळे पुढील काही काळ आगामी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर यंदाची शिवजयंती देखील साधेपणाने व उत्साहात साजरी करा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

पुण्यात व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे शिवजयंती उत्सव आढावा बैठकीचे आयोजनक करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार बोलत होते. बैठकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने जारी केलेल्या सूचनांना नागरिकांनी कायमच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या काळात आलेले सर्व धर्मांचे सण-उत्सव साधेपणाने साजरे करत समजूतदारपणा दाखवला आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारकडून 19 फेब्रुवारीची शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले जात आहे. त्याला नेहमीप्रमाणे नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी खात्री असल्याचे अजित पवार म्हणाले.