… तर भाजीपाला मार्केटही बंद करावं लागेल : अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यामध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत असताना देखील लोक सरकारने दिलेल्या सूचनांच पालन करत नसल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘सुशिक्षित लोकच बेजबाबदारपणे वागत आहे,हे दुर्दैव आहे. भाजीसाठी गर्दी करू नये,अन्यथा भाजीपाला मार्केटही बंद करावं लागेल,असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राज्य सरकारने कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केली आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात संसर्गाचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे. जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे. तरीही अनेक ठिकाणी लोक गर्दी करताना दिसत आहे. संसर्ग टाळण्यासाठीच्या सूचना पाळल्या जात नाही.त्यामुळे अजित पवार यांनी पुन्हा एकदा जनतेला सरकारच्या सूचनांचं पालन करण्यात यावं असे आवाहन केलं आहे.

पुण्यातील पहिल्यांदा जे कोरोना बाधित जोडपं आढळलं होत.त्यांचा आज दुपारी दुसरा अहवाल येणार आहे. त्याबाबत दिलासा देणारी बातमी येईल अशी अपेक्षा आहे.तरीही कुणीही गाफील राहून चालणार नाही. भाजीपाला मार्केटमध्ये आज देखील गर्दी होताना दिसत आहे. भाजीपाल्याचा पुरवठा सुरु आहे.अफवांवर विश्वास ठेवू नका.गर्दी करू नका अशी विनंती त्यांनी केली आहे.

‘हे तर मेलेल्यांच्या टाळूवरच लोणी खाणारे’- अजित पवार

कोरोनाचा संसर्ग व त्यामुळे निर्माण होणाऱ्या भीतीचा गैरफायदा घेत काही लोकांनी साठेबाजी केल्याच्या बातम्या येत आहे. त्याबाबत अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून,’मास्कची साठेबाजी करणाऱ्यांविरोधात अशी कठोर कायदेशीर कार्यवाही केली जाईल की त्यांना त्यांच्या दोन पिढ्या आठवतील.यांना तर मेलेल्यांच्या टाळूवरच लोणी खाणारेच म्हणायला हवं.तसेच राज्य सरकाने दिलेल्या सूचना लोकांनी गांभीर्याने जर घेतल्या नाही तर अधिक कठोर पावले उचलावे लागतील,असंही ते म्हणाले.