अजित पवार शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात; उपमुख्यमंत्री म्हणाले – ‘पोलिसांचा वचक पाहिजे तो गुंडांवर, सामान्यांवर नाही’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  एका गुन्हयात निर्दोष सुटलेल्या कुविख्यात गुंडाची तळोजा ते पुणे जंगी मिरवणूक निघाली. हे शहराच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी चांगल नाही. तरुण पिढी पुढे आपण आदर्श चुकीचा ठेवत असून, ते घातक आहे. अश्या घटना घडता कामा नये. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष ठेवावे. पोलिसांचा वचक पाहिजे तो गुंडांवर, सामन्यावर नाही. जनतेच्या मनात विश्वास तयार करावा आणि असल्या लोकांना पोलिसांनी पाठीशी घालता कामा नये, असे अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचित केले आहे.

शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात आयोजित मुद्देमाल पुन:प्रदान व अनुकंपा भरती पोलिस पाल्य नियुक्तीपत्र कार्यक्रमात अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर आयुक्त अशोक मोराळे, नामदेव चव्हाण, डॉ. जालिंदर सुपेकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, कोरोनाचे संकट वाढले आहे. १ फेब्रुवारी पासून रुग्ण संख्या वाढली आहे. ज्यांनी या काळात जिवाची बाजी लावून काम केले आहे, ते कौतुकास्पद आहे. आजही पोलिस काम करत आहे. या काळात काही पोलिसांना काम करताना वीर मरण आले आहे. त्याचवेळी या काळात काही घडलेच तर कुटुंब उघड्यावर पडू नये, यासाठी ५० लाख रुपये मदत व एकाला नोकरी असा निर्णय घेतला. त्यानुसार आज अनुकंपनुसार त्यांच्या पाल्याना नियुक्तीपत्र दिले आहे. दरम्यान पोलिसांवर टीका झाली. पण नियमांचं पालन करताना कठोर वागावं लागतं. त्याला नाईलाज आहे, असे देखील यावेळी पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख आणि राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या काळात झाली नाही.  पण आता झाली आहे. याबाबत मी जिल्हाधिकारी बरोबर रविवारी बैठक ठेवली आहे. आढावा घेणार असून, कशाप्रकारे पुढील काळात काम करावे लागेल यासाठी ही बैठक आहे. त्यातून काम झाले आहे. राज्यात काही शहरात लॉकडाऊन केले आहे. मास्क वापरणे गरजेचे आहे आणि आपण देखील सूचनाचे पालन करणे गरजेचे आहे. पोलिस दलात स्टाफ कमी आहे, त्यासाठी पोलिस भरती करत आहोत. त्याची प्रोसेस सुरू असून, लवकरच हे काम सुरू आहे.

तर यावेळी अजित पवार चोरी झाल्याबाबत म्हणाले की,  नागरिकांनी देखील अंगभर दागिने घेऊन जाताना काळजी घेतली पाहिजे. घरात काम करणारे तसेच परिसरात किंवा संशयित वाटलं तर त्यांची माहिती पोलिसांना दिली पाहिजे. अनेकवेळा अश्या प्रकरणात घरातलच कोणी तरी असतं, असं दिसतं.

तर दुसरीकडे अनेकजण फॅमिलीसोबत बाहेर फिरायला गेल्यानंतर फोटो सोशल मीडियावर टाकतात. मग चोरट्यांना दिसतं. त्यामुळे फिरायला जा, पण ते फोटो घरी गेल्यानंतर कुठे टाकायचे ते पहा. प्रत्येक गोष्ट पोलिसांवर कशी सोपवता. पोलिसांच्या घरांचे काम हाती घेतले आहे. ते सुरू आहे. थोड्या अडचणी आहेत. पण काम सुरू आहे.

प्रास्ताविक करताना पोलीस आयुक्त गुप्ता म्हणाले, की अनुकंपामधून ६० लोकांना आपण नियुक्तीपत्र देणार आहोत. त्यात आज कोरोना काळातील वीर मरण आलेल्या ५ कुटुंबांतील पाल्यांना देण्यात येत आहेत. आज ६० पैकी ३४ जण रुजू झाले आहेत. तसेच गेल्यावर्षी ९ कोटींचा मुद्देमाल परत केला होता. तर मध्येच ३ कोटींचा माल परत केला. सर्वाधिक माल हस्तगत करणे याचे पोलिस महासंचालक कार्यालयाकडून देण्यात येणारे पारितोषिक पुणे पोलिसांना मिळाले आहे. तर आजच्या कार्यक्रमात सव्वा कोटींचा मुद्देमाल पुन्हा प्रदान केला जात आहे. हे श्रेय पोलिस निरीक्षक व पोलिस आयुक्त, इतर अधिकाऱ्यांच आहे, त्यांची मेहनत आहे. नागरिकांना पोलिसांकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याचे आमचे काम आहे. ते आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावेळी पोलिस आयुक्त गुप्ता यांनी अजित पवार यांच्याकडे टेम्पररी पीएसआय असतात. त्यांना लाभ मिळालेला नाही. त्यात कोरोना काळात काहीजण मयत झाले आहेत. त्याबाबत आपण निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. आभार अप्पर पोलिस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी मानले.

कार्यक्रमात अजित पवार यांच्या हस्ते दहा पाल्यांना नियुक्ती पत्र दिले आहे. त्यांची नावे. 

निखील भगवान पवार, अभिजीत सुरेश दळवी, राहुल विलास सरोदे, अक्षय भगवान निकम, आकाश पांडुरंग घुले तसेच कोमल खैरनार, लोचना महाडिक, आदिती जाधव/टोपले आणि साकेत सोनवणे (लिपिक)

राजू भालेराव (कार्यालयीन शिपाई) यांना हे पत्र प्रतिनिधिक स्वरूपात पत्र दिले आहे. 

यावेळी नियुक्तीचे पत्र मिळाल्यानंतर आकाश घुले या पाल्याने मनोगत व्यक्त करताना “आज आमच्या आयुष्यातील आनंदी आणि दुःखी दिवस आहे. वडिलांचा कोवीडमुळे मृत्यू झाला. २६ दिवस वडील रुग्णालयात होते. या काळात आम्हाला मानसिक आधार पोलिसांनी दिला. कोणतीच अडचण आली नाही. पोलिस आयुक्तांनी स्वतःच नंबर दिला. तर आधार देत काळजी न करण्याचं आश्वासन देखील दिलं होतं. मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. आता माझी जबाबदारी आहे, काम करण्याची, ते मी करणार आहे.

चतुःश्रृंगीच प्रकरण…

चतुःश्रृंगीचे पोलिस चोरांना पाहून पळून गेल्याच्या प्रकरणावर अजित पवार यांनी भाष्य केलं. पोलिसांनी रात्र गस्ती वाढवावी. गुन्हे होणार नाहीत यावर काम करावं. पण, मध्यंतरी पोलिसच चोरांना पाहून पळाले. मला वाईट वाटलं. का घडलं हे शोधणं गरजेचं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते काम केलं पाहिजे. त्यांच्यावर कारवाई केली, हे खरं असलं तरी वर्षभर काम करणाऱ्या पोलिसांचं मनोबल यामुळे कमी होऊ नये. कारण याचा परिणाम त्यांच्या मनावर होतो.

पोलिस हे सरकारचे हे शासनाचे प्रतिनिधी असतात. ते कसे वागतात यावरून शासन कसे हे दिसते. पोलिसांचा वचक हा गुन्हेगार व चोरांवर असला पाहिजे. तो नागरिकांवर नसला पाहिजे. कोरोना काळात ऑनलाइन गुन्हे वाढले आहेत. सायबर गुन्ह्याच्या त्यादृष्टीने काम सुरू करा. शिपाई व अधिकारी त्यांनी हे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना तयार करा

रेल्वे पोलिस मजेदार असतात… 

रेल्वेत पाकीटमार चोर असतात. तिथे पाकीट चोरी होते. पण रेल्वे पोलिस एखाद्या जबाबदार व्यक्तीचे पाकीट असेल तर ते मिळवतात, हे कसं काय घडतं काय माहिती नाही, पण हे घडतं. त्या व्यक्तीला घरी नेवून पाकीट दिलं जातं. त्यामुळे वेगळ्या चर्चेला वाव मिळतो असं देखील अजित पवार म्हणाले.

हे चुकीचं आहे…

मध्यंतरी मुंबईत होतो. त्यावेळी काही पोलिस अधिकारी आले होते. ते ३५ लाख रुपयांच्या गाड्यात आले होते. आता आपण मंत्री किंवा इतरांना गाड्या घेताना त्याची नियमावली असते. मग मी माहिती घेतली. तर कोण्या उद्योगपतीने कॅनन्व्हायसाठी या गाड्या दिल्या होत्या. त्यातल्या काही गाड्या अधिकारी वापरतात. आपण  शासनाचे अधिकारी आहात. कुणी उद्योगपतीने गाड्या दिल्या म्हणून शासनाची ड्युटी करताना अश्या गाड्या वापरणं ही विचार करण्याची बाब आहे. गृहमंत्री वेगळ्या गाडीत फिरतात आणि अधिकारी वेगळ्या गाडीत. पण ड्युटीवर असताना हे करण चुकीचे आहे. खासगी आयुष्य कुणीही कसं जगावं. पण ड्युटीवर असताना त्याचा आदर आणि पालन झालेच पाहिजे.