कर्नाटकमधील मंत्र्यांना अजित पवारांनी झापलं, म्हणाले – ‘मुंबई महाराष्ट्राचीच’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक व्याप्त भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केली. यावर “महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद भागात राहणाऱ्या लोकांची अशी मागणी आहे की, मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात यावा. त्यामुळे जोपर्यंत मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश केला जात नाही, तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावं,” असं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्र्यांनी केलं होतं. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांच्या या विधानावरुन महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

दरम्यान, “महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. बेळगावमध्ये मराठी भाषिक आमदार आणि महापौर होते. तिथल्या बहुसंख्या नागरिकांची मागणीही महाराष्ट्रात येण्याची आहे. कर्नाटक सरकारने त्यात फेरफार करुन बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला. मुंबईवर कर्नाटकने हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही. मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि कायम राहणार, अशा शब्दांत अजित पवारांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत. तसंच, कर्नाटकच्या मंत्र्यांनी हे विधान त्यांच्या जनतेला खूश करण्यासाठी केलं असावं, त्यांच्या विधानाला कशाचाही आधार नाही, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.