पुत्र पार्थच्या विजयासाठी अजित पवारांचे भाजप नेत्यांना कॉलिंग ? अनेकांनी उंचावल्या भुवया

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मावळ लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मावळमध्ये राष्ट्रवादी नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर भाजप-सेना युतीकडून श्रीरंग बारणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपल्या मुलाला निवडणुकीत जिंकवून आणण्याकरीता अजित पवार सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याचे पहायला मिळत आहे. यातच मावळ मतदार संघ जिंकण्यासाठी अजित पवार यांनी भाजप नेत्यांना फोन करून पार्थला मदत करण्याचे आवाहन केले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सर्वांनी भुवया उंचावल्या आहेत.

अजित पवार सध्या कर्जत, उरण, पनवेल या परिसरातील सेना- भाजप नेत्यांना फोन करून पार्थला मदत करा असे सांगत आहेत. “मी उपमुख्यमंत्री असताना आपल्याला मदत केली आहे. आता आपण पार्थला मदत केली पाहिजे, आपल्यासोबत विविध विषयांवर चर्चा करता येईल”, असे फोनवरून सांगत असल्याची माहिती मिळाली आहे.

मावळची लढत प्रतिष्ठेची
देशात सध्या युतीची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे नवख्या पार्थ पवार यांना ही निवडणूक तशी सोपी जाणार नाही. म्हणूनच पवार कुटुंबाला ही निवडणूक महत्वाची वाटते. खुद्द शरद पवार यांनी माघार घेऊन पार्थला उमेदवारी देण्याचे ठरवले आहे. तसेच मावळ मतदार संघ राष्ट्रवादीचा घरचा मतदार संघ मानला जातो. त्यामुळे साहजिकच या मतदार संघातली लढत प्रतिष्ठेची मनाली जात आहे.

पुढच्या आठवड्यामध्ये अजित पवार, आमदार सुरेश लाड, सुनील तटकरे, जयंत पाटील, प्रमोद हिंदुराव यांनी सेनेच्या भाजपाच्या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ ठरवली असल्याचे समजते आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने मतांचे योग्य नियोजन केले आहे. सेना आणि भाजप नेते कोणाला मदत करतात यावरच मावळ मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होईल.