अजित पवारांनी ‘शब्द’ दिल्यानं विधान परिषदेसाठी शिंदे – मिटकरी यांच्यात ‘चुरस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ठाकरे सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून खातेवाटपही झालं आहे. विधानसभेतून हुकलेल्या नेत्यांना आता विधान परिषदेचे वेध लागले आहेत. काहीजण विधान परिषदेची मागणी करत आहेत. यासाठी कोणी आश्वासनांवर अवलंबून आहे तर कोणी आपल्या ताकदीवर. या जागांसाठी चांगलीच चुरस लागणार असं दिसत आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे विधानसभेत विजयी झाल्याने त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली आहे. राष्ट्रवादीचे साताऱ्याचे नेते शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यात या जागेसाठी चुरस लागली आहे.

ही जागा तशी राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे आता या जागेवर साताऱ्याचे शशिकांत शिंदे आणि स्टार प्रचारक अमोल मिटकरी हे दोघेही इच्छुक आहेत. हे दोन्हीही नेते राष्ट्रवादीसाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आता या जागेसाठी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शशिकांत शिंदे हे शरद पवारांचे विश्वासू मानले जातात. साताऱ्याचे दोन्ही राजे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी पक्षाच्या विजयासाठी पाऊल टाकत झुंज दिली. परंतु काही थोड्या फरकानं ते पराभूत झाले होते. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याआधीच घोषणा केली होती की, विधान परिषदेची रिक्त होणारी पहिली जागा अमोल मिटकरी यांना देणार. खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यानं अमोल मिटकरी यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

शशिकांत शिंदे हे सभागृहात दिसावेत अशी पवारांची इच्छा आहे. मात्र पराभूतांना विधान परिषद मिळणार नाही असं अजित पवारांनी निकाल लागताच स्पष्ट केलं होतं. शिंदे हे पवारांच्या मर्जीतले असल्याने ते याला अपवाद ठरतील का असा सवालही उपस्थित होतो. शिंदेंचा पराभव पवारांसाठी खूपच त्रासदायक होता. त्यांच्या पराभवानंतर खासदार श्रीनिवास पाटील यांच्या विजयसभेला साताऱ्याला जाणंही पवारांनी रद्द केलं होतं. आता या जागेसाठी मिटकरींना आमदार करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शब्द चालणार की, शरद पवारांशी असलेली शिंदेंची निष्ठा कामी येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/