मंत्रिमंडळात आपणच ‘दादा’ असल्याचे ‘अजित पवार’ यांनी दिले दाखवून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना आपल्या कामाच्या झपाट्याने अजित पवार यांनी आपणच मंत्रिमंडळात ‘दादा’ असल्याचे दाखवून देऊ लागले आहेत. मंगळवारी दिवसभरात अजित पवार यांनी तीन महत्वाचे निर्णय घेऊन आपल्या कामाचा झपाटा दाखवून दिला.

वाडिया रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावणे, इस्टर्न फ्री वेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देणे आणि राज्यातील गुन्हेगारी संपवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश देत अजित पवार यांनी आपण उपमुख्यमंत्रीच नाही तर मुख्यमंत्री असल्यासारखे इतर मंत्र्यांच्या खात्यासंबंधी निर्णय घेतले.
मुंबईतील वाडिया रुग्णालय मुंबई महापालिका व राज्य शासनाचे अनुदान न मिळाल्यामुळे अडचणीत आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर याबाबत बैठक ठरली होती. असे असताना त्याच्या अगोदर अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या सोबत बैठक घेत रुग्णालयासाठी ४६ कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे सांगत प्रश्न मार्गी लावला आणि एकप्रकारे मुख्यमंत्री ठाकरे यांना आपल्या निर्णयाची री ओढायला भाग पाडले.

एकनाथ शिंदे यांच्या खात्याशी संबंधित असलेल्या ईस्टर्न फ्री वेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचा निर्णय घेऊन टाकला. आपल्या पक्षाचे आणि नागपूरचे असलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खात्याबाबतही अजित पवार यांनी आदेश देऊन आपणच प्रमुख असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. राज्यातील विशेषत: नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारीची दखल घेत कोणतेही लागेबांधे न पाहता कठोर कारवाई करण्याचे पवार यांनी निर्देश दिले.

अजित पवार हे गेली पाच वर्षे सत्तेपासून बाहेर असले तरी त्यांची अजूनही प्रशासनावर पकड आहे. त्याचबरोबर प्रशासनाकडून कसे काम करुन घ्यायचे याची त्यांना जाण आहे. आपल्या कामाचा उरक आणि वेग यामुळे मंत्रिमंडळात आपण पॉवरफुल्ल असल्याचे ते दाखवून देऊ लागले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/