दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री झाल्यानं राष्ट्रवादीतील ‘या’ 2 दिग्गज नेत्यांची वाढली जबाबदारी

पोलीसनामा ऑनलाईन टीम : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर सोमवारी (दि. 5) राजीनामा दिला. त्यानंतर गृहमंत्रीपदाचा कारभार कोणाकडे सोपवणार अशी चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात सुरु होती. अखेर सायंकाळी नव्या गृहमंत्र्यांच्या नावाचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रात गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे -पाटील यांच्याकडे द्यावा असे म्हटले आहे.

अनिल देशमुख गृहमंत्रिपदाचा राजीनामा देऊन दिल्लीला गेले आहेत. तर इकडे राज्याचे नवे गृहमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच देशमुखांचा राजीनामा स्वीकारावा असे विनंतीपत्र पत्र मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिले आहे. या पत्रात दिलीप वळसे – पाटील यांच्याकडे सध्या असलेला राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे द्यावा तसेच कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफाकडे द्यावा अशी विनंती राज्यपालांना लिहलेल्या पत्रात केली आहे.

त्यामुळे अजित पवार यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे. दरम्यान गृहमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीमध्ये चार जणांची नावे चर्चेत होती. यात शरद पवारांचे विश्वासू प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राजेश टोपे, कामगार मंत्री आणि दिलीप वळसे पाटील यांचे नाव चर्चेत होते. अखेर वळसे- पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.