विधानपरिषदेचे नेतेपद अजित पवारांकडे, 5 तालिका सभापतींच्या नावांची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज (सोमवार) कामकाज सुरु होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली. यापूर्वी शिवसेनेचे सुभाष देसाई हे विधानपरिषदेचे सभागृह नेते होते. त्यांच्या जागी अजित पवारांची निवड करण्यात आली आहे.

2020 मध्ये विधान परिषदेमधील अनेक आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. जून 2020 मध्ये राज्यपाल नियुक्त 12 आमदार महाविकास आघाडीकडून निवडले जाणार आहेत. मागील वर्षी पाच वर्षात विधान परिषदेतील भाजपची सदस्य संख्या वाढलेली आहे. त्यामुळे विधानपरिषदेत सरकारची बाजू भक्कम मांडणाऱ्या नेत्याची नियुक्ती करणे आवश्यक होते. अजित पवार हे आक्रमक आणि स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. तर सुभाष देसाई हे मवाळ नेते म्हणून ओळखले जातात.

अजित पवार हे कामकाजासाठी आग्रही असतात. तसेच नियमानुसार कामकाज चालावे, नवीन सदस्यांना बोलण्याची संधी देण्याची त्यांची आग्रही भूमिका असते. सभागृहात नियमांचे दाखले देत कामकाज चालवण्याचा आग्रह नागपूर अधिवेशनात त्यांनी धरला होता. त्यामुळे विधानपरिषदेच्या कामकाजात सुसूत्रता येण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात चंद्रकांत पाटील हे विधानपरिषदेचे सभागृह नेते होते.

तालिका सभापतींची नावे
शिवसेना सदस्य गोपिकीशन बाजोरिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, भाजपचे अनिल सोले, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत आणि काँग्रेसचे सुधीर तांबे हे अर्थसंकल्पीय अधिवेशनात तालिका सभापती म्हणून काम पाहणार आहेत.