दिवाळीपर्यंत शाळा सुरू होऊ शकत नाही, अजित पवारांनी दिली ही महत्वाची माहिती, म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी कोरोना पूर्णपणे नष्ट झालेला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा, महाविद्यालये अद्यापही बंद आहेत. राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. दिवाळीपर्यंत शाळा सुरु होऊ शकत नाही, दिवाळीनंतर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ अशी माहिती अजित पवार यांनी दिली. दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचा आढावा घेण्यात येईल, दिवाळीआधी शाळा सुरु होणार नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

माझं कुटुंब, माझी जबाबदारी या अभियानाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार या अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अभियानाला पुणेकरांनी साथ द्यावी असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. यावेळी पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक किटचे अजित पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

अजित पवार यांनी सांगितले की, आपण कोरोना महामारीच्या संकटातून जात आहोत. मध्यंतरी सोशल डिस्टसिंगकडे दुर्लक्ष झाले. त्याचा परिणाम पुणेकरांनी भोगला आहे. सुरुवातीला लोक कोरोना झाल्याचं सांगायला घाबरायचे, आता मात्र, परिस्थिती बदलत आहे. पुण्यात डिसेंबर, जानेवारीत दुसरी लाट येऊ शकते, हा अंदाज खोटा ठरवण्यासाठी जबाबदारीने वागा, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

बाबांनो कोरोनाला लाईटली घेऊ नका

पुणेकरांना फटकारताना अजित पवार म्हणाले, पुणेकरांनो, नो मास्क दंडाच्या माध्यमातून 12.5 कोटी जमा झाले आहेत. हे बरं नाही. बरेच जण हनुवटीच्या खाली मास्क लावतात. बाबांनो कोरोनाला लाईटली घेऊ नका, असे पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, मध्यंतरी काही लोकांनी गरज नसताना औषधं घेऊन ठेवली. काहींनी काहीच काळजी घेतली नाही. त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. सरकार आणि प्रशासन चांगलं काम करत आहे. मात्र, नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे अजित पवार म्हणाले.

अधिकाऱ्यांना दिले थेट कारवाईचे आदेश

कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे अशा रुग्णालयांवर कार्यवाही करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत. तसेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेचा दुसरा टप्पा प्रभावीपणे राबवून कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.