संजय राऊतांच्या ‘स्टेपनी’ नंतर अजित पवारांबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात मुलाखतीदरम्यान अजित पवार यांचा उल्लेख स्टेपनी असा केला होता. यावरून नवा वाद निर्माण झाला असून राष्ट्रवादीकडून अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. अजित पवारांचे समर्थक देखील आक्रमक असल्याचे बोलले जात आहे. हा वाद ताजा असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारामतीत होते. निमित्त होते बारामतीत भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाचं.

बारामतीत भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी हे प्रदर्शन पाहण्यासाठी काही वेळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे एकाच गाडीत बसले. त्यावेळी त्यांनी अजित पवारांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला. प्रदर्शन पाहण्यासाठी जाताना अजित पवार हे गाडी चालवत होते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या गाडीत बसले. त्यावेळी गाडीत बसताना ठाकरे म्हणाले, आमच्या गाडीचं ‘चाक’ अजित दादांकडेच आहे. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

बारामतीत शारदानगर येथील 110 एकर मध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादासाहेब भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, खासदार सुप्रिया सुळे, सिने अभिनेते अमीर खान उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like