अजित पवारांकडून राज ठाकरेंचे कौतुक, विनोद तावडेंचा केला ‘पोपट’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेने लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, मोदी सरकारविरुद्ध प्रचार करणार असून त्यासाठी विविध ठिकाणी सभा घेत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरुद्ध मोहिम उघडली आहे. राज यांनी आपल्या भाषणामधून भाजपच्या धोरणांना विरोध करण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी मोदी विरोधात सुरू केलेल्या मोहिमेचे अजित पवार यांनी कौतुक केले आहे.

बारामती येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले आहे. आपल्या भाषणात अजित पवार म्हणाले, इतके दिवस राज ठाकरे भाजपकडून भाषण करत होते. त्यावेळी भाजपच्या नेत्यांना उकळ्या फुटत होत्या. पण आता ते विरोधात भाषण करायला लागले की विनोद तावडे पोपटासारखे बोलू लागले आहेत, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. राज ठाकरे आपल्या भाषणातून पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची सद्यस्थिती स्क्रिन द्वारे सर्वांना दाखवत आहेत. आणि मुख्यमंत्री म्हणतात राज ठाकरे यांची स्क्रिप्ट बारामतीवरून येते. राज ठाकरे हे बाळासाहेबांचे पुतणे आहेत. त्यांना कशाला स्क्रिप्ट लिहून द्यावी लागेल, असा टोला अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर करून मोदी सरकार विरुद्ध प्रचार करण्याचे जाहीर केले होते. या प्रचारादरम्यान ते मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची पोलखोल करत त्यांच्या पाच वर्षांच्या कारभाराचा पंचनामा करणार असल्याचे सांगितले होते. याशिवाय राफेल घोटाळा आणि नोटबंदीसारख्या फसलेल्या योजनांबाबतची विस्तृत माहिती देणाऱ्या प्रेझेंटेशनसोबतच सरकारच्या कारभारासंबंधीची काही ‘धक्कादायक सत्ये’ ही उजेडात आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार राज ठाकरे राज्यात सभा घेत असून या सभांमधून मोदी सरकारच्या कामांचे प्रझेंटेशन सभेत दाखवत आहेत.