अजित पवार ‘मॅन ऑफ अ‍ॅक्शन’ ! शत्रुघ्न सिन्हांनी संजय राऊतांना दिली ‘ही’ उपमा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. आघाडीकडून मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. मात्र, संपूर्ण सत्तासंघर्षाच्या नाट्यात भाजपची सगळ्यात मोठी कोंडी झाली. अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने सरकार स्थापन केले. मात्र, अवघ्या साडेतीन दिवसांत अजित पवारांनी राजीनामा दिल्याने सरकार कोसळले. दिल्लीतील चाणाक्यांची अखेरची खेळीही यशस्वी ठरली नाही. सिने अभिनेता आणि पूर्वाश्रमीचे भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी नवीन सरकारला शुभेच्छा देऊन शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे कौतुक केले आहे.

राज्याच्या सत्तासंघर्षात अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर सरकार अल्पमतात गेले. महाराष्ट्रातील भाजपच्या या पराभवावरून शत्रुघ्न सिन्हा यांनी अजित पवार यांचे कौतुक करताना ‘मॅन ऑफ अ‍ॅक्शन’ असे म्हणत अजित पवारांचे कौतुक केले. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांना ‘हनुमान’ असे संबोधले आहे. या राजकीय घडामोडीत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या संजय राऊत यांचे विशेष कौतुक केले आहे. तसेच महान मराठा नेता आणि आजचे लोहपुरुष, चाणक्य असे म्हणत शरद पवारांचे कौतुक केले. तर सुप्रिया सुळेंनी महत्वाची भूमिका बजावली असे सिन्हा म्हणाले.

महाराष्ट्रात आज राजकारणाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. उद्धव यांच्या रुपाने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे या शपधविधी समारंभाला उपस्थित होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला देशभरातले दिग्गज नेते उपस्थित होते. काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, कपील सिब्बल, एम. के स्टॅलीन, शंकरसिंह वाघेला यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. राज ठाकरे हे सहकुटूंब या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांची उपस्थिती हा चर्चेचा विषय ठरली.

Visit : Policenama.com