पुत्रप्रेमापोटी अजित पवारांकडून काँग्रेस नेत्यांच्या भेटी-गाठी 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मावळ लोकसभेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र पार्थ यांचा राजकारणाशी तसेच कार्यकर्त्यांशी काहीही संबंध आलेला नाही.  त्यामुळे पुत्रप्रेमापोटी अजितदादांनी प्रचारासोबतच काँग्रेस नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटी-गाठी घेण्यावर भर दिला असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद –

मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यावरून शहर काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. राष्ट्रवादीने काँग्रेसचे अतोनात नुकसान केले असल्याने एका गटाचे म्हणणे आहे.  तर वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयाप्रमाणे राष्ट्रवादीचा प्रामाणिकपणे प्रचार करण्याची दुसऱ्या  गटाची भूमिका आहे. जुनी उणीदुणी न काढता आघाडी धर्म पाळण्याचे आवाहन करताना शहराध्यक्ष सचिन साठे म्हणाले की , राष्ट्रवादीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे. तशी हमी अजित पवारांनी दिली आहे. पुढील आठवडय़ात दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक होणार आहे.’

पार्थ यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी शहरातील प्रमुखांच्या गाठीभेठी तसेच दूरध्वनीवरून संपर्क साधण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. पिंपळे निलख येथे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या घरी अजित पवार तासभर होते. शहरात काँग्रेसचा हक्काचा मतदार असल्याचे सांगत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पार्थच्या प्रचारात सक्रिय सहभागी व्हावे, अशी विनंती त्यांनी साठे यांना केली.