उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीत गोंधळ, संभाजीराजेंचा अवमान केल्याचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- मराठा समाजाच्या विकासासाठी आयोजित केलेल्या सारथी संस्थेच्या बैठकीत गोंधळ झाला आहे. बैठकीवेळी संभाजीराजेंना बसण्यासाठी मागील बाजूची खुर्ची दिली गेल्याने मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

“बैठकीदरम्यान संभाजीराजेंना मागील बाजूला खुर्ची देण्यात आली. अजित पवार व सरकारने जाणूनबुजून संभाजीराजेंचा अवमान केला” असा आरोप बैठकीस उपस्थित असलेल्या मराठा क्रांती मोर्च्याच्या इतर समन्वयकांनी केला. यामुळे काही काळासाठी बैठकीत तणावाचं वातावरण निर्माण झालं होत. परंतु , संभाजीराजेंनी संयमाची भूमिका घेता हा वाद मिटवला.

अजित पवार यांच्या दालनात बैठक सुरु

संभाजीराजेंच्या आसन व्यवस्थेवरुन वाद झाल्यानंतर आता बैठकीचं ठिकाण बदलण्यात आलं असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात ही बैठक सुरु झाली आहे. त्यावेळी संभाजीराजेंना अजित पवारांच्या बाजूला बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून सारथीसंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा सुरु झाली आहे.

कोण-कोण आहेत बैठकीला उपस्थित?

सारथी संस्थेला भरीव आर्थिक तरतुद करण्याच्या मागणीवरून राज्यातील वातावरण ढवळू लागल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला संभाजीराजे छत्रपती, अजित पवार, नवाब मलिक, विजय वडेट्टीवार उपस्थित आहे. तसेच विनायक मेटे आणि मराठा क्रांती मोर्च्याचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सुद्धा बैठकीला हजेरी लावली आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या हितासाठी स्थापन झालेल्या संस्थेबाबत जे आंदोलन करण्यात आलं होत. त्याचा दबाव निर्माण झाल्याने हे निमंत्रण आल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं होत. याआधी पुण्यात झालेल्या आंदोलनंतर जी आश्वासने दिली ती पाळली गेली नसली तरी देखील समाजाच्या हितासाठी आपण या चर्चेला जात असल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.