अजित पवार घेणार राज ठाकरेंची भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मोदी सरकारविरोधात महाआघाडी एकवटली असून महाआघाडीत येण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हाक दिली आहे. आता अजित पवार हे राज ठाकरेंची समोरासमोर भेट घेणार आहेत. या दोघांची होणारी बैठकी ही गुप्त बैठक होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

मनसे आघाडीत येणार की नाही याबाबत शंका आहेच. तरी मनसे आघाडीत आली तर आघाडीची ताकद वाढेल हे निश्चित आहे. त्यामुळे या बैठकीत नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसेने मुंबईठाणेपुणे आणि नाशिक इथल्या जागांची मागणी केल्याची माहिती यापूर्वीच आली होती. मात्र त्याबाबत स्पष्ट माहिती नव्हती. त्यामुळे या बैठकीत लोकसभा जागा वाटपावरून चर्चा होण्याची शक्यता आहे.

मनसेने समविचारी पक्ष म्हणून आघाडीसोबत यावं. मतविभाजन टाळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे. धर्मनिरपेक्ष विचारधारा ठेवून एकत्र आलं पाहिजे. मनसेने गेल्यावेळी एक लाख मतं घेतली होती. माझं वैयक्तिक मत आहे की एकत्र आले पाहिजे, असं जाहीर आवाहन अजित पवार यांनी केलं होतं. राष्ट्रवादीने हा मनसेला आघाडीत घेण्यासंबंधीचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवला होता. मात्र काँग्रेसने तो नाकारला आहे.

दरम्यान, अजित पवार आणि राज ठाकरे यांच्या भेटीत नक्की काय होईल हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु लोकसभा निवडणूकीबाबत चर्चा होऊन जागांबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे. तसंच आघाडीत येणार की नाही हेही स्पष्ट होणार आहे.