राज्यपालांच्या ‘विचित्र’ अटीमुळं सरकार स्थापन करणं ‘अशक्य’ : अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं एकत्र निवडणुका लढल्याने पाठिंब्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी मिळूनच घ्यायचा आहे. स्थिर सरकार स्थापन करण्याची गरज आहे. मात्र राज्यपालांच्या विचित्र अटीमुळे सरकार स्थापन करणं अशक्य आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिल आहे याविषयी माहिती देताना अजित पवार म्हणाले की, ‘सरकार स्थापन करायचं असेल तर काँग्रेससोबत चर्चा केल्याशिवाय आम्हाला कोणताही निर्णय घेता येत नाही. सध्या काँग्रेसचे आमदार जयपूरमध्ये आहेत. वरिष्ठ नेते दिल्लीत असल्यानं चर्चेत अडचणी येत आहेत. वेळेअभावी बैठक कोणत्या ठिकाणी घ्यायची हेदेखील महत्त्वाचे आहे. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ कमी आहे. राज्यपालांनी सर्व आमदारांच्या सह्या असलेलं पत्र मागितलं आहे. ही विचित्र अट पूर्ण कऱणं अवघड आहे. ‘

सोमवारी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पाठिंबा पत्र मिळवण्यास अपयश आले. याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘काँग्रेसकडून मिळणाऱ्या पाठिंब्याची पत्राची सकाळी दहा पासून संध्याकाळी साडेसात पर्यंत सर्वच नेते वाट बघत होते. मात्र पत्र मिळालं नाही. काँग्रेसकडून सकाळी ते मिळेल असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर दुपारी मिळेल असं कळवलं. पण शेवटी थोडा वेळ लागेल असं सांगितलं अखेर पोहोचलंच नाही. तसंच राष्ट्रपती राजवट लागली तरी काही होत नाही, मॅजिक फिगर जुळली की पुन्हा सत्तेवर येऊ शकतो जरा सबुरीने घ्या. आघाडीमध्ये समजुतदारपणा होता. मात्र आम्ही सेनेसोबत कधीच सरकार चालवलेलं नाही त्यामुळे अनेक प्रश्न आहेत. आज आम्ही चर्चा करू आणि आमच्यात काही ठरलं तर पुढचा निर्णय घेऊ.’

महाराष्ट्रात सरकार स्थापनेवर दिल्लीत आज मंथन सुरूच राहणार आहे. आज रात्रीपर्यंत महाराष्ट्रात सरकार बनणार की नाही हे स्पष्ट होईल.

Visit : Policenama.com