फोन टॅपिंग प्रकरणावर अजित पवारांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘त्या बदल्या झाल्याच नाहीत, सीताराम कुंटेंचा अहवाल वाचा’

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन – तत्कालीन गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडून या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला टार्गेट केले जात आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना स्पष्टीकरण दिले आहे. या प्रकरणाचा मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना प्राप्त झाला असून, त्यातून वस्तुस्थिती समोर आली आहे. त्या फोन टॅपिंगमध्ये दावा केलेल्या बदल्या प्रत्यक्षात झाल्याच नाहीत, असे पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, की मुख्य सचिव सीताराम कुंटेंचा अहवाल समोर आला आहे. तो अहवाल जर वाचला तर वस्तुस्थिती सगळ्यांसमोर येईल. विरोधकांना काहीही माहिती मिळाली, की त्यावर ते आरोप करत सुटतात. पण, आम्हाला मात्र शहानिशा केल्याशिवाय उत्तर देता येत नाही. कुंटेंच्या अहवालानंतर वस्तुस्थिती समोर आली आहे. विरोधकांनी दावा केलेल्या आणि कथित फोन टॅपिंगमध्ये नाव आलेल्या बदल्या झाल्याच नसल्याचे अहवालातून समोर आले आहे. त्या फोन टॅपिंगमध्ये म्हटले होते, की पिंपरीत कुणाचीतरी आयुक्त म्हणून नियुक्ती होणार होती, पण ती झाली नाही. तर कुणाची ठाण्यात होणार होती, ती झाली नाही. नवी मुंबईत देखील होणार होती, ती झाली नाही. जे काही संभाषण झाले आहे. त्यासंदर्भात कोणत्याही नेमणुका झाल्या नाहीत. कारण, नेमणुकांच्या शिफारशी कमिटीने केल्या आहेत. ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाते. त्यातून वस्तुस्थिती समोर आल्याचे पवार म्हणाले. त्यामुळे आता विरोधकांकडून या मुद्द्यावर काय भूमिका घेतली जाते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.