‘त्यांच्या’ मागण्या ऐकण्या इतकी तरी संवेदनशीलता दाखवा ; पवारांनी उद्धव ठाकरेंचे टोचले कान  

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई महापालिकेच्या खाजगी प्राथमिक शाळांच्या शिक्षिकांनी सोमवारी मातोश्रीबाहेर आंदोलन केले होते. पण या आंदोलकांची आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली नाही यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ‘संवेदनशीलता दाखवा’ असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुखांचे कान टोचले आहेत. त्यांनी याबाबतचे ट्विट आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केले आहे.

अजित पवार यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे की, “शिक्षकांच्या आंदोलनाची दखल तर घेतलीच नाही, पण उद्धव ठाकरे, दाराच्या उंबरठ्यावर आलेल्या शिक्षिकांची भेट घेऊन किमान मान राखायचा. विनाअनुदानित मराठी शाळांना अनुदानाची रक्कम मिळाली तर ती नवसंजीवनी ठरेल. त्यांच्या मागण्या ऐकण्या इतकी तरी संवेदनाशीलता दाखवा !” अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

नेमके काय आहे प्रकरण ?
मुंबई महापालिकेच्या खाजगी प्राथमिक शाळांच्या शिक्षिकांनी मातोश्रीबाहेर सोमवारी आंदोलन केले. महापालिकेच्या मान्यता दिलेल्या १०४ खाजगी शाळांना महापालिकेने अनुदान द्यावे या मागणीसाठी मातोश्रीसमोर शांततापूर्ण आंदोलन केले गेले. यावेळी ‘साहेब मराठी शाळा वाचावा अशी हाक देखील देण्यात आली’
शिक्षिकांच्या डोळ्यात पाणी…
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बाहेर येऊन भेटत नाही तोपर्यंत मातोश्रीच्या गेटवरुन हटणार नाही असा या शिक्षिकांचा निर्धार होता. मात्र उद्धव ठाकरे भेटणार नाहीत, आंदोलनाची ही जागा नाही, असं म्हणत पोलिसांनी शिक्षिकांना मातोश्रीसमोरुन हटवले. तरीही शिक्षिकांनी मातोश्रीसमोरच्या फूटपाथवरच ठिय्या आंदोलन केलं. यावेळी शिक्षिकांच्या डोळ्यात पाणी होतं. याआधी गेले २२ दिवस विनाअनुदानित खाजगी शाळांतील शिक्षकांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरु होतं. मात्र याची दखल घेतली गेली नाही. महापौर, शिक्षण समिती अध्यक्ष, आयुक्त यांना भेटूनही काही तोडगा निघाला नाही. त्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून मातोश्री समोर आंदोलन करण्यात आलं.
आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
शिवसेना नेते अनिल परब यांच्या चर्चेच्या आश्वासनानंतर मातोश्रीसमोरील शिक्षिकांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं. मात्र, येत्या दोन दिवसात तोडगा निघाला नाही तर आंदोलन तीव्र करु असा इशारा शिक्षिकांनी दिला. घराबाहेर आलो तरी उद्धव ठाकरेंनी साधी भेटही घेतली नाही, त्यामुळे मराठी शाळेच्या शिक्षिकांमध्ये नाराजी आहे.