अजित पवारांनी टोचले भाजपा आमदाराचे कान, म्हणाले – ‘लसनिर्मिती प्रकल्प कुठेही झाला तर आनंदच’

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाविरुध्दच्या लढ्यात महाराष्ट्र एकजुटीने लढत असतानाच राज्यात सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगला आहे. आता भारत बायोटेकने लस निर्मितीसाठी पुण्यातील जागा निवडल्याने आरोप होत आहेत. भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्यात पळवल्याचा आरोप भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे.

त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सडेतोड उत्तर दिले आहे. लसनिर्मिती प्रकल्प कुठेही झाला तर आनंदच आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुण्याला पळवला आमदार खोपडे यांचा आरोप खोटा, जनतेची दिशाभूल करणारा, औट घटकेच्या प्रसिद्धीसाठी केलेला केविलवाणा प्रयत्न असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथील जागा भारत बायोटेक कंपनीला कोरोना लसनिर्मिती प्रकल्पासाठी देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होईल हे पाहण्याची जबाबदारी पुण्याचा पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी पार पाडली आहे. भारत बायोटेकचा लसनिर्मिती प्रकल्प पुणे, नागपूरसह राज्यात कुठेही झाला असता तरी मला आनंदच झाला असता.

भारत बायोटेकने मांजरी येथील बंद पडलेल्या इंटरवेट इंडिया प्रा लि. कंपनीची जागा मिळावी असा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता. त्या प्रस्तावावर तातडीने निर्णय व्हावा म्हणून भारत बायोटेकने उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती. न्यायालयाने कोरोनाचे संकट व लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन मांजरी येथे भारत बायोटेकचा प्रकल्प सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत, असेही पवार यांनी सांगितले.