गँगस्टर गजा मारणेच्या मिरवणूकीबाबत अजित पवार म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  कुख्यात गुंड गजानन मारणे याची दोन खून प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर मुंबईतील तळोजा कारागृहातून त्याची सुटका झाल्यानंतर शेकडो वाहनांचा ताफा घेऊन मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर उर्से टोलनाका येथे मिरवणूक जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून राज्यातील कायदा सुवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात अधिक माहिती आल्यानंतर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे

शिवजयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री पवार शुक्रवारी (दि. 19) शिवनेरी गडावर उपस्थित होते. शिवनेरी गडावरील शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी पवार म्हणाले की, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अडचणी निर्माण करणारे कोणीही असेल मग ती राजकीय क्षेत्रातील असेल किंवा गुंडगिरी करणारी असेल. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांसाठी नियम लावले गेले पाहिजेत असे म्हणत पवारांनी खडसावले आहे. शिवाय, सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.