‘त्या’ प्रकरणात मी दोषी आढळलो तर मला फाशी द्या – अजित पवार

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावल्या. प्रचारादरम्यान आरोपांच्या फेरी झाडल्या जात आहे. आज अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मावळ गोळीबार प्रकरणात मी दोषी आढळलो तर देशातल्या कुठल्याही चौकात मला फाशी द्या. हे आरोप खोटे निघाले तर आरोप करणाऱ्याना फाशी द्या. असं धक्कादायक वक्तव्य अजित पवार यांनी केलं.

चौथ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये आज प्रचार संपला. प्रचारादरम्यान राजकिय नेत्यांनी एकमेकांवर हल्लाबोल करताना एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने अजित पवार शिरूर मतदारसंघातील उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आले होते. अजित पवार यांच्यावर मावळ येथे शेतकरी आंदोलन चिरडण्यासाठी गोळीबार केल्या प्रकरणात हात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, या देशात, राज्यात सरकार तुमचं आहे. कितीही आणि कुठेही चौकशी करा. चौकशीत मी जर दोषी आढळलो तर मला देशातल्या कुठल्याही चौकात फाशी द्या. पण जर आरोप खोटे निघाले तर आरोप करणाऱ्यांना फाशी द्वावी लागेल.

यावेळी शिरूर मधील प्रचार दौऱ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने विमानतळ, बैलगाडा शर्यती, पुणे नाशिक महामार्गावरील वाहतुक कोंडी या मुद्यांवरून अढळराव पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.