…तर आमचा पायगुण वाईट आहे म्हणू नका, उपमुख्यमंत्री पवार यांची टोलेबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  म्हाडाच्या घरासाठी नंबर निघाला तर आमच्याबद्दल चांगल बोला, नाही आला तर आमचा पायगुण वाईट आहे, असे म्हणू नका, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच गरीब, मध्यमवर्गीयांना घर मिळावे म्हणून म्हाडा ही योजना राबत आहे. म्हाडाचा व्यवहार भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आहे. कोणी पैसे घेवून घर मिळवून देतो म्हटले तर पोलिसात तक्रार करा, आपल्याला पारदर्शकता टिकवायची असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यावेळी म्हणाले.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) कार्यक्षेत्रातील पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 5 हजार 647 सदनिका विक्रीसाठी ऑनलाइन सोडत उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते आज शुक्रवारी (दि. 22) होणार आहे. यासाठी ते नेहरू मेमोरियल हॉल येथे दाखल झाले आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान म्हाडाच्या घरासाठी 1 लाख 13 हजार लोकांनी नोंदणी केली आहे. यात 92 हजार पेक्षा जास्त लोकांनी पैसै भरले आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेतून पुणे जिल्ह्यात म्हाळुंगे (चाकण) येथे 514 तळेगाव दाभाडे येथे 296, तर सोलापूर जिल्ह्यात करमाळा येथे 77 आणि सांगली येथे 74 सदनिका आहेत. तर मोरवाडी पिंपरी येथे 87 पिंपरी वाघेरे येथे 992 सदनिका आहेत. सांगली येथे 129 सदनिका आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यात म्हाळुंगे येथे एक हजार 880, दिवे येथे 14 तर सासवड येथे 4 सदनिका आहेत. सोलापूर जिल्ह्यात 82 सदनिका आहेत. 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत पुणे महापालिका क्षेत्रात 410 पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात 1 हजार 20 आणि कोल्हापूर महापालिका येथे 68 सदनिका आहेत.