गिरीश बापट भाजपचे नव्हे तर पुणेकरांचे खासदार – उपमुख्यमंत्री पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गिरीश बापट यांचा विचार काँग्रेस सारखा आहे. बापट भाजपचे खासदार नाही, तर पुणेकरांचे खासदार आहेत. सर्व पक्षात त्यांचे संबंध असल्यानेच ते आमदार, खासदार म्हणून निवडून येतात, अशी कोपरखळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी लगावली आहे.

संवाद पुणे आयोजित ‘प्रबोधन’चा शतकोत्सव या कार्यक्रमाच्या समारोपात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. पवार म्हणाले की, आपल्या इथे काही लोकांची शॉर्ट मेमरी असते. ते ताजी-ताजी गोष्ट लक्षात ठेवतात, मात्र नंतर त्याचे परिणाम दिसतात. प्रबोधनकार यांनी ठाकरे शैली निर्माण केली. निर्भीड, परखडपणे बोलण्यासाठी ठाकरे शैली समोर आली आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शेतकरी मोर्चाबद्दलच्या वर्तनावरही टीका केली. राज्यपालांना बऱ्याच दिवसांपूर्वी शेतकरी नेत्यांनी भेटायचे असल्याचा निरोप दिला होता. ज्यावेळी शेतकऱ्यांचा प्रश्न असतो त्यावेळी पूर्वनियोजित कार्यक्रम बदलू शकतो हे त्यांनी ठरवायचे असते. मात्र, राज्यपालांबद्दल मी काही बोलणं योग्य वाटत नाही, असेही पवार यांनी अधोरेखित केले.