२० फेब्रुवारीला नांदेडमध्ये मित्रपक्षांची एकत्र सभा : अजित पवार

मुबंई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभेत भाजप आणि शिवसेनेच्या युतीचे घोडे अडले आहे. त्यात विरोधक आघाडी अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आघाडीबाबत माहिती दिली आहे. सर्व समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढवावी, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आघाडीचे पुढचे प्लॅन स्पष्ट केले आहेत.

आघाडीत येण्यासाठी अजित पवार इतर पक्षांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी महाआघाडीबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशीही चर्चा करून मार्ग काढणार आहोत अशी माहितीही अजित पवार यांनी दिली. तर सर्व मित्रपक्षांना एकत्रित घेऊन २० फेब्रुवारीला नांदेडमध्ये सभा घेणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माढ्यातून लोकसभेसाठीच्या उमेदवारीवर अजित पवार यांना विचारण्यात आले. त्यावर शरद पवारांनी निवडणूक लढवावी, असा सर्वांनी एकमुखाने आग्रह धरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माढा लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांच्या नावाची चर्चा असली तरी अद्याप राष्ट्रवादीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.