अजित पवारांच्या ‘या’ वक्तव्याने शिवसेनेची ‘धाकधूक’ वाढली

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सत्ता स्थापन न झाल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यातच आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विश्वासावर एनडीएतून बाहेर पडली. तर आज भाजपने अधिकृतपणे शिवसेना एनडीएमधून बाहेर पडल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या विश्वासावर शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला. मात्र अद्याप सत्ता स्थापनेचे काहीच ठरताना दिसत नाही. दोन्ही काँग्रेसमध्ये फक्त चर्चाच सुरु असून त्यातून कोणताही मार्ग निघत नसल्याने शिवसेनेची चिंता वाढत चालली आहे.

सत्ता स्थापनेबाबत अजुनतरी काहीही मार्ग निघण्याची चिन्ह दिसत नसतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे अद्याप काहीही ठरलेलं नाही. माध्यमांनी उगाच नको त्या चर्चा करु नये असे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेची धाकधूक वाढली आहे. तसेच आमदार फुटण्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. अनेकजण पहिल्यांदाच निवडून आले आहेत त्यामुळे फाटाफूट होणार नाही. काहींनी पक्ष सोडल्यावर काय होते ते साताऱ्यात पाहिलेच आहे.

त्यानंतर चित्र स्पष्ट होईल
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला ठरला असल्याच्या बातम्या सध्या दाखवल्या जात आहेत. यावर बोलताना अजित पवार म्हणाले फॉर्म्युला ठरला अशा बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. अद्याप काहीही ठरलेलं नाही. याबद्दल त्या त्या पक्षाचे सर्वोच्च नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत या सगळ्या वावड्याच आहेत. 19 नोव्हेंबरला सोनिया गांधी आणि पवार साहेबांची भेट होणार आहे. त्यानंतर सत्ता स्थापनचे सगळं चित्र स्पष्ट होईल.

तोपर्यंत गोड बातमी येणार नाही
भाजपने काय बोलायचे हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्याकडे बहुमत असताना देखील त्यांनी सत्ता स्थापन केली नाही. आम्ही विरोधी पक्षात बसण्याच्या मानसिकतेत होतो. मात्र, आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर सत्तेबाबत मार्ग काढता येतोय का या बाबत सगळेच प्रयत्न करत अहेत. जोपर्यंत 145 च्या पुढे आकडा होत नाही तोपर्यंत गोड बातमी येणार नाही आणि तोपर्यंत आपल्याला राष्ट्रपती राजवटीतच रहावे लागणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Visit : Policenama.com