Pune News : अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला ! म्हणाले – ‘परत जायला तुम्हाला बोलवलं कुणी होतं ?’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे कोल्हापूरवरून येऊन पुण्यात कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. नुकतंच चंद्रकांत पाटील यांनीच मी कोल्हापूरला परत जाणार असं एका जाहीर कार्यक्रमात स्पष्ट केलं. यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी त्यांच्या निशाणा साधला आहे. कोल्हापूरात परत जायला तुम्हाला बोलवलंच कुणी होतं ? असं पवार म्हणाले आहेत. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते.

‘अरे तुम्हाला पुण्यात बोलवलं कुणी होतं ?’
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेताना अजित पवार म्हणाले, एक जण म्हणतो मी पुन्हा येईन, दुसरा म्हणतो मी परत जाईन. एकाला पुन्हा येईन काही जमलं नाही. पंरतु हे म्हणतायत परत जाईन. अरे तुम्हाला पुण्यात बोलवलं कुणी होतं ? असा टोला त्यांनी लगावला आहे.

‘इथं आलातच कशाला ?’
पुढे बोलताना पवार म्हणाले, तुम्ही इथे आलात आणि आमदार झालात. त्यामुळं इथल्या आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी नाराज झाल्या. जनतेनं निवडून दिलंय सेवा करायला आणि तुम्ही परत जायची भाषा करता. मग इथं आलातच कशाला ? असा सवालही पवारांनी केला आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?
चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, प्रत्येकाला पुण्यात सेटल व्हावं असंच वाटतं. मी पुण्यात राहणार नाही. देवेंद्रजी मी परत कोल्हापूरला जाणार आहे. माझ्या विरोधकांना सांगून टाका असंही ते म्हणाले होते.