Ajit Pawar : ‘संजय काकडेंची विश्वासार्हता पुणेकरांना विचारा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घुसमट होत आहे. त्यामळे मुख्यमंत्री ठाकरे आज ना उद्या आघाडी सरकारमधून बाहेर पडतील असे विधान भाजपचे माजी खासदार आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी केले होते. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काकडे यांना टोला लगावला आहे. काकडे यांच्या विधानाला फारस महत्व देण्याची गरज नाही. ते पुण्याचे आहेत त्यांची विश्वासार्हता पुणेकरांनाच विचारा, असा खोचक टोला पवारांनी लगावला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. 7) पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुण्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आणि लसीकरणासंदर्भातील सविस्तर माहिती पवार यांनी दिली. राज्य सरकारने पुणे शहरासंदर्भात कोरोना रूग्णांची आकडेवारी सादर केली होती. त्यावर आक्षेप नोंदवत न्यायालयाने पुण्यात कडक लॉकडाऊन लावण्याच्या सुचना केल्या होत्या. मात्र यावर राज्य सरकारने पुण्याची चुकीची आकडेवारी सादर केल्याचा आरोप पुण्याच्या महापौरांनी केला होता. तसेच आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले होते. आता उपमुख्यमंत्री पवारांनी महापौरांनी तातडीने कोर्टात जावे असे सांगितले. तसेच पुण्याच्या लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी भूमिका जाहीर करत लॉकडाऊनचा चेंडू थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात भिरकावून दिला आहे.