उद्या परळीत 80 मेगावॅटच्या सोलार प्रकल्पाचे अजित पवार यांच्या हस्ते लोकर्पण

बीड पोलीसनामा ऑनलाईन

परळी तालुक्यातील मलनाथपुर येथे 500 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या 80 मेगावॅट खासगी सोलार पॉवर प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (दि.7) माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते आमदार अजित पवार यांच्या हस्ते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

परळी तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत राज्य व केंद्रातील भाजपा सरकार जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे परळीच्या विकासाला चालना मिळावी, बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यात खासगी तत्वावर प्रकल्प उभे रहावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

या प्रयत्नांमधुनच सोलार एज पॉवर अ‍ॅण्ड एनर्जी प्रा.लि व स्टर्लिंग अ‍ॅण्ड विलियम्स या कंपण्यांनी परळी तालुक्यात 500 कोटी रुपये खर्चून 80 मेगा वॅट विज निर्मितीचा सोलार प्रकल्प उभा केला आहे. त्यासाठी मलनाथपुर, वाघाळा, म्हातारगांव या गावातील 400 एकर जमीन संपादीत करण्यात आली असून, त्या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. येथून 80 मेगा वॅट विज निर्मीती सुरु झाली असून सदर वीज कंपनी तर्फे महाराष्ट्र शासनाला दिली जाणार आहे. अतिशय झपाट्याने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला असून, त्यामुळे अनेक बेरोजगारांच्या हाताला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळाला असून यापुढेही अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या प्रकल्पाची उभारणी पूर्ण झाल्यामुळे त्याचे लोकार्पण गुरुवार सकाळी 10 वाजता मलनाथपुर ता. परळी येथे होणार्‍या कार्यक्रमात अजित पवार यांच्या हस्ते व धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी हे मान्यवर परिसरातील शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत.

तालुक्याच्या विकासाला चालना देणार्‍या या प्रकल्पाच्या लोकार्पण समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे व सोलार एज पॉवर अ‍ॅण्ड एनर्जी प्रा.लि व स्टर्लिंग अ‍ॅण्ड विलियम्न या कंपन्यांच्या वतीने करण्यात आले आहे.