पुण्याच्या मध्यवस्तीतील दुकाने उघडण्याबबात अजित पवारांनी दिला ‘हा’ आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. पुण्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने पुणे शहरातील सर्व व्यवसाय दोन महिन्यांपासून बंद आहेत. पुण्यातील व्यापारी महासंघाने शहराच्या मध्य भागातील सर्व प्रकारची दुकाने उघडण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यापारी संघटनेच्या मागणीवर निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार सोमवारी प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे.

रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, भवानी, रास्ता, गणेश, नाना पेठ आणि येरवडा भागातील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने आणि पोलिसांनी दिले आहेत. त्या बाबत महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, उपाध्यक्ष रतन किराड, सचिव महेंद्र पितळीया, अतुल अष्टेकर, विपुल अष्टेकर यांनी विधानभवनावर अजित पवार यांची आज भेट घेतली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड तसेच विशेष अधिकारी सौरभ राव उपस्थित होते.

प्रतिबंधित क्षेत्रात ज्या ठिकाणी रुग्ण सापडले आहेत, तो परिसर सील करावा, अन्य ठिकाणी व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महासंघातर्फे करण्यात आली आहे. यावर अजित पवार यांनी दुकाने बंद ठेवण्यास कोणी सांगितले अशी विचारणा केली. पोलिसांनी दुकाने बंद ठेवण्यास सांगितल्याचे अधिकाऱ्यांनी पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावर अजित पवार यांनी याबाबत सोमवारी बैठक घेऊन त्वरित निर्णय घ्या, असे आदेश सौरभ राव यांना दिले. तसेच त्या बैठकीला पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनाही बोलवण्यास सांगितले.
यावर रांका म्हणाले, ज्या ठिकाणी रुग्ण आहेत, तेथे दुकाने उघडण्याची आम्ही परवानगी मागितलेली नाही. परंतु, ज्या ठिकाणी रुग्ण नाहीत तेथील दुकाने उघडण्यास परवानगी द्या. कोणताही भाग सरसकट सील करणे योग्य नसल्याची आमची भूमिका असल्याचे रांका यांनी सांगितले.