बेरोजगारीची भीषणता : तंत्रशिक्षणाच्या उच्चशिक्षित युवकांनी केला सफाई कामगारपदासाठी अर्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशाच्या राजकारणात विरोधकांनी अनेक प्रश्नांवर बोट ठेवले आहे. त्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी, त्यांच्या आत्महत्या आणि देशातील तरूणांची बेरोजगारी हे महत्त्वाचा विषय आहे. मोदी सरकारने २०१४ च्या लोकसभा निवडणूकांमध्ये वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्यात येतील, असं आश्वासन दिलं होतं. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे बेरोजगार तरूण हा एक मोठा आणि ज्वलंत प्रश्न आहे. या प्रश्नावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे.


अजित पवार यांनी केलेल्या या पोस्टमध्ये एक फोटो आहे. हा फोटो म्हणजे तामिळनाडूमधील एका बातमीचा नमुना आहे. तामिळनाडूमधील मंत्रालयातील सफाई कामगारांसाठी १४ जागा निघाल्या आहेत. या जागांसाठी अभियांत्रीकी, एमबीए, एमटेक, अशा पदवीधारक ४ हजार तरूणांनी अर्ज केले आहेत. या कामाचे वेतन १५७००/- ते ५०,०००/- रुपये एवढे असणार आहे. शिवाय या कामासाठी अर्जदारला एक अट असून ती म्हणजे उमेदवार हा सक्षम असणे आवश्यक आहे, असा सर्व मजकूर या फोटोत लिहीला आहे.

आमचे अभियंते आणि एमबीए आता सफाईदारांच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करीत आहेत! या देशातील तरुणांना तोंड द्यावे लागणाऱ्या बेरोजगारीचा मोठा मुद्दा स्वीकारण्यासाठी पीएमओ इंडियाला काय म्हणायचे आहे?, असा सवाल अजित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे. तसंच एनएसएसओच्या अहवालांमुळे वास्तव बदलणार नाही. तर समाधानांवर लक्ष केंद्रित होईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.